सरूड : अनिल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनवडे पैकी शिंदेवाडी (ता. शाहूवाडी) येथील गुरुनाथ रामचंद्र शिंदे या तरुण प्रगतिशील शेतकऱ्याने २० गुंठे जमिनीत कलिंगडाची लागवड करून दोन महिन्यांमध्ये एक लाख रुपयांहून जास्त उत्पन्न मिळविले आहे. सोनवडेसारख्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या डोंगराळ व दुर्गम भागात गुरुनाथ शिंदे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करीत मोठ्या जिद्दीने कलिंगडाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला.
शिंदे यांनी प्रथम शेताची मशागत करून त्यामध्ये दोन ट्रॉली शेणखत टाकले. त्यानंतर पाच फुटाच्या अंतराने सरी सोडली. या सरीवर मल्चिंग पेपर अंथरून सव्वा फुटाच्या अंतराने मेलोडी जातीच्या सुमारे तीन हजार रोपांची लागण केली. लागणीनंतर या सर्व रोपांना त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले तसेच आवश्यकतेनुसार थोड्याफार प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला. रोपांवर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी कीटकनाशक औषधांची फवारणीही करण्यात आली. फळ लागणीवेळी प्रतिरोप दोन फळे याप्रमाणे तीन हजार रोपांतून त्यांनी सहा हजार कलिंगड फळाचे उत्पादन घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाहूवाडी तालुका सरचिटणीस असणाऱ्या गुरुनाथ शिंदे यांनी या सर्व फळांची विक्री व्यापाऱ्यांना न करता बांबवडे, सरूड परिसरातील बाजारपेठेमध्ये जाऊन त्यांनी स्वत: थेट ग्राहकांपर्यंत या कलिंगडांची विक्री केली. त्यामुळे शिंदे यांना अपेक्षित नफाही मिळाला.
शेत मशागत, खते, औषधे व मजूर आदींचा उत्पादन खर्च वजा जाता साठ दिवसांच्या या कलिंगड पिकातून शिंदे यांनी सुमारे १ लाखाचा निव्वळ नफा मिळविला आहे. यासाठी त्यांना कृषिमित्र ऋषिकेश पाटील (बच्चे सावर्डे) व डोणोली येथील पाटील कृषिसेवा केंद्राचे शिवाजी पाटील (सातवे) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
चौकट
पारंपरिक शेतीतून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. स्थानिक शेतकरी कुटुंबियातील बेरोजगार तरुणांनी नवनवीन शेती तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती केल्यास निश्चितच शेतीमधून कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे या कलिंगड शेतीच्या यशस्वी प्रयोगावरून सिद्ध झाले आहे. -गुरुनाथ शिंदे, प्रगतिशील शेतकरी, सोनवडे पैकी, शिंदेवाडी, ता. शाहूवाडी.
फोटो ओळी .. सोनवडेपैकी शिंदेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी गुरुनाथ शिंदे यांनी फुलविलेली कलिंगडाची शेती.