उदगाव (ता. शिरोळ) येथील वाढीव वसाहतींच्या अतिक्रमणाचा मोठा विषय होता. गेले कित्येक वर्षे या मुद्यावरच बऱ्याचशा स्थानिक निवडणुकादेखील लढविल्या. ही अतिक्रमणे कायम करण्याकरिता २०१८ मध्ये शासनाने मूल्यांकन केले होते. याची गावनिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त आहे. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयातून ग्रामपंचायतीकडे पाठविण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. अवचितनगर, बाळासाहेब मानेनगर, बेघर वसाहत, दर्गा परिसरात घराची मोजणी करून कागदपत्रांची पाहणी केली जात आहे. कुटुंब प्रमुखांची विविध माहिती संगणक प्रणालीत अपलोड करणे व फॉर्मही भरून घेण्यात येत आहे.
उदगाव येथे ९७ अतिक्रमणधारक असून येत्या चार दिवसांत मोजणी व माहिती भरण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गावठाणमधील अतिक्रमण कायम होण्यासाठी नागरिकांकडून पाठपुरावा सुरू होता. अखेर ग्रामपंचायतीकडून प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. त्यासाठी ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, सतीश माने, जालंदर बंडगर यांच्यासह कर्मचारी पडताळणी करीत आहेत.
फोटो - ०७०७२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळी - उदगाव (ता. शिरोळ) येथे अतिक्रमण घरांची मोजणीप्रसंगी ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी यांच्यासह कर्मचारी.