कोल्हापूर : ‘ब्लेड रनर’ आॅस्कर पिस्टोरियने कृत्रिम पाय लावून सशक्त असलेल्या पुरुषांच्या आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत सर्वांनाच धक्का दिला होता. एरव्ही सराव नसताना दोन पायांसह धावतानाही अनेकांची तारांबळ उडते. मात्र, ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये दिव्यांग बांधवांसह विशेष मुलांनी धाव घेत अन्य धावपटूंप्रमाणेच आपला उत्साह दाखवून ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे दाखवून दिले.सकाळी आठ वाजता या मॅरेथॉनची सुरुवात झाली. त्यामध्ये चेतना विकास मंदिर व जिज्ञासा विकास मंदिर येथील ५० मुलांनी सहभाग घेतला होता. ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा, महामॅरेथॉनच्या संयोजिका रुचिरा दर्डा, आमदार प्रकाश अबिटकर, महालक्ष्मी इस्पात प्रा. लि. अभिषेक गांधी, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, उदय जोशी, यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महामॅरेथॉनमध्ये विशेष मुलांसाठी खास एक किलोमीटर ‘प्रोत्साहन रन’चे आयोजन केले. या रनची सुरवात होताच उपस्थितीत धावपटू व पालकांनी टाळ्या वाजवून सर्वांनाच प्रोत्साहन दिले. काही पालक व संबंधित लोक दिव्यांगासमवेत या रनमध्ये सहभाग झाले व धावण्यासाठी ऊर्जा दिली. फिनिशिंग लाईन येथे हे धावपटू येताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला; तर आपण आपले टार्गेट पूर्ण केल्याचा आनंद या मुलांच्या चेहºयावर दिसत होता. ‘या स्पर्धेत सहभागी होऊन आम्हाला खूप आनंद झाला, अशा बोलक्या प्रतिक्रिया विशेष मुलांनी व्यक्त केल्या.गतिमंद मुले हे समाजाचा एक अविभाज्य भाग आहेत, हे आपण सर्वांनी ओळखून आमच्या मुलांना यामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. येथील नेटके नियोजन, व्यवस्था पाहून मुले खूप खूश झाली आहेत. असे जिज्ञासा विकास मंदिराचे विशाल दीक्षित यांनी सांगितले.
हम भी किसीसे कम नहीं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:59 AM