कोल्हापूर : अनादी कालापासून सिद्धभूमी असलेल्या सम्मेद शिखरजीवर पर्यटन सुरू झाले, तर पवित्रता नष्ट होणार आहे. भगवान महावीरांनी अहिंसा, जगा आणि जगू द्या, हे तत्त्वज्ञान जगाला दिले. आम्ही अहिंसक आहोत, पण भित्रे नाही. आमच्या तीर्थक्षेत्रासाठी आज जैन समाज रस्त्यावर उतरला आहे. तुम्ही आमच्या हृदयावर घाव घातला आहे, आमच्या संयमाचा बांध फुटू देऊ नका, वेळ पडली, तर दिल्लीला धडक देऊ, पण केंद्र सरकारने शिखरजीला शाश्वत जैन तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी व जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीं यांनी मंगळवारी सरकारला दिला. भगवान महावीर दीक्षा घेण्यापूर्वी क्षत्रिय होते, हे जैन समाजाने व सरकारनेही ध्यानात घ्यावे, असेही यावेळी ठणकावून सांगण्यात आले.सम्मेद शिखरजीला दिलेला पर्यटन स्थळाचा दर्जा मागे घ्यावा, या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी व जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे, राजू शेट्टी, माजी आमदार सुजित मिणचेकर, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, संजय शेटे, अशोकराव माने, राजू लाटकर उपस्थित होते.लक्ष्मीसेन महास्वामी म्हणाले, अनेक लोक म्हणत आहेत पर्यटनस्थळाचा दर्जा दिला तर बिघडलं कुठं, देशाची प्रगती होईल. आमचा प्रगतीला अडथळा नाही. पर्यटनाच्या नावाखाली त्या सिद्धभूमीवर मत्स्यपालन, कुक्कुटपालन, बार, रेस्टॉरंट होणार असून, त्यामुळे पावित्र्य नष्ट होणार आहे. गिरनार, पालितानामध्ये सध्या हेच सुरू आहे, अशी अवस्था आम्हाला सम्मेद शिखरजीची होऊ द्यायची नाही. जैन समाज अहिंसेने, संयमाने वागणारा आहे. यापूर्वीही ब्रिटिशांनी येथे पर्यटन सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी समाजाने लढा देऊन ब्रिटिश व्हाइसरॉयला हा निर्णय मागे घ्यायला लावला.नांदणीचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी म्हणाले, सम्मेद शिखरजी आमचे हृदय आहे, प्रत्येक जैन श्राव-श्राविकांच्या हृदयात तुम्हाला शिखरजी दिसेल. आम्ही अहिंसक आहोत, भित्रे नाही. या पवित्रस्थानी आम्ही दारू, मांस, मच्छी चालू देणार नाही. विना चप्पल आज रस्त्यावरून मोर्चात चालताना माझे फक्त पायच तापले नाहीत, तर मस्तकही तापले आहे. देशभरातून जैन समाजाचा मोर्चा निघत असताना केंद्र व झारखंड सरकार गप्प का आहे? आम्ही फक्त रस्त्यावर येणार नाही, तर दिल्लीला धडक मारू.भट्टारक पट्टाचार्य महास्वामी म्हणाले, देशात जैन समाज अल्पसंख्यांक असला, तरी २४ टक्के कर आम्ही भरतो. आता फक्त सम्मेद शिखरजीचा विषय आला आहे, पण यासोबतच गिरनार, पालीताना, शत्रुंजय ही सगळी तीर्थक्षेत्रे आम्ही मिळवू.
Sammed Shikharji: आम्ही अहिंसक जरूर आहोत, भित्रे नाही; लक्ष्मीसेन महास्वामींनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 1:11 PM