म्हाकवे : कार्यकर्त्यांना नेहमीच संघर्ष करावा लागू नये, यासाठी आम्ही जुळवून घेत होतो. याचा अर्थ आम्ही जमवाजमवीतील आहोत असा नाही. आम्ही दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांचा स्वाभीमानी विचार जोपासणारे आहोत.त्यामुळे स्वाभिमानाला धक्का लागल्यानंतर संघर्षालाही आपण कमी पडत नसल्याचे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दाखवून दिले आहे. यापुढेही लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचा स्वाभिमानी विचार कायम जपू असा निर्धार खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.हमिदवाडा (ता.कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कारखाना प्रेरणास्थळावर लोकनेते मंडलिक यांच्या सातव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सागर देशपांडे होते.स्व.मंडलिक यांचे स्वप्न असणारा इथेनॉल हा महत्वकांक्षी प्रकल्प येत्या चार दिवसात पुर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचेही खासदार मंडलिक यांनी सांगितले. यावेळी बाबासाहेब पाटील-सरुडकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रा.जीवन साळोखे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विजयसिंह मोरे, सुरेशराव कुराडे महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले, जि.प.सदस्य अर्जुन आबिटकर,उपाध्यक्ष बापुसाहेब भोसले, बंडोपंत चौगुले, एस आर बाईत,अतुल जोशी आदी उपस्थित होते.....तर पहिला राजीनामा मंडलिकांचामॉलमधून वाईन विक्रीचा निर्णय शेतकरी हिताचा असता तर मग यापूर्वीच हा निर्णय का घेतला नाही. असा सवाल उपस्थित करत स्व.मंडलिक यांनी रान उठविले असते. ते जरी मंत्रीमंडळात असते तरीही त्यांनी आपला राजीनामा देऊन या निर्णयाला विरोध केला असता. भावी पिढी बरबाद होवू नये. याची राजकीय जाण असणारे ते बुलंद नेतृत्व होते अशा आठवणी यावेळी सांगण्यात आल्या.
मंडलिकांची छबी.... मतदानाची हमीकागल, राधानगरी, भुदरगड, आजरा भागात जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी भेटी देत होतो. यावेळी अनेकांच्या घरात स्व.मंडलिक यांचे फोटो पहायला मिळत. त्यावरून मतदानाची हमी मिळत होती. माझ्या उमेदवारीबाबत मंडलिकांनी बंड केले. त्यामुळेच आपण जिल्हा बँकेत जावू शकलो, अशी कृतज्ञताही बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी व्यक्त केली.