कोल्हापूर : महालक्ष्मी स्तोत्र पठण, गायन, नृत्य, नाटिका, गोंधळ, वासुदेव नृत्य, लावणी अशा विविध कलांच्या सादरीकरणाने बुधवारी काेल्हापूर रंगकर्मीच्या वतीने गेले आठ दिवस सुरू असलेल्या कलाबाजार या अभिनव आंदोलनाची सांगता केली. कलाकारांनी मायबाप सरकारने नाट्यगृह व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाला परवानगी द्यावी, अशी कळकळीची मागणी केली.
या आंदाेलनाची सांगता बुधवारी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाहेर विविध कलांच्या सादरीकरणाने झाली. वेदा सोनुले, वैदेही जाधव यांनी महालक्ष्मी स्तोत्र म्हणून सादरीकरणाला सुरुवात केली. श्रद्धा शुक्ल यांनी पोटासाठी नाचते मी ही लावणी, सागर बगाडे यांनी गोंधळ नृत्य, यशपाल व महेश सोनुले यांनी गीत, रवी व गोविंद सुतार यांनी जनप्रबोधन गीत सादर केले. याशिवाय पोवाडा, नाटिका, वासुदेव नृत्य अशा विविध कलांचे सादरीकरण केले.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने सध्या राज्यात सर्व उद्योग-व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. सगळे व्यवहार सुरळीत झाले असताना नाट्यगृह व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आहे, कलाकारांच्या मागणीनंतर ५ नोब्हेंबरपासून नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, गेले दीड वर्ष कलाकार बसून आहेत. सध्या सणांचा कालावधी असल्याने या काळात कार्यक्रमांना सादरीकरणाची परवानगी मिळावी, यासाठी कोल्हापूर रंगकर्मींच्या वतीने कलाबाजार हे अभिनव आंदोलन केले. रोज शहरातील चौकाचौकात वेगवेगळ्या कलांचे सादरीकरण करण्यात आले.
--
फोटो नं १५०९२०२१-कोल-कलाबाजार०१
ओळ : कोल्हापूर रंगकर्मींच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या कलाबाजार या अभिनव आंदोलनाची सांगता बुधवारी केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात झाली. यावेळी श्रद्धा शुक्ल यांनी लावणी सादर केली.
---
०२
कलाकारांनी शिवचरित्रातील प्रसंग सादर केला.
---