कोल्हापूर : ठराव गोळा करण्यास सुरुवात झाल्यानंतर गोकुळच्या राजकारणात रोज वेगवेगळे कंगोरे सामोरे येत आहेत. आमचं ठरलंय म्हणत सत्ताधाऱ्यांविरोधातील आवाज उठवणाऱ्या विरोधी गटातील विनय कोरे हेदेखील माजी आमदार महादेवराव महाडिक यांना मदत करणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील मदतीची परतफेड म्हणून कर्णसिंह गायकवाड यांना संचालकपद मिळवून देण्यासाठी कोरे यांनी ही भूमिका घेतली आहे.विरोधी गटातील प्रमुख शिलेदार असलेले विनय कोरे हेदेखील महाडिकांच्या बाजूने झाले आहेत. त्यांच्या संस्था गोकुळशी संलग्न नसल्या तरी त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुमारे शंभरावर संस्थांचे ठराव आपल्याकडे वळवू शकतात. शाहूवाडीमध्ये सर्जेराव पाटील पेरिडकर यांच्याकडे जास्त ठराव आहेत.
या जोरावरच त्यांनी एखादी जागा मिळावी म्हणून सत्ताधाºयासमवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत शाहूवाडी मतदारसंघात कर्णसिंह गायकवाड यांनी मदत करण्याच्या बदल्यात गोकुळच्या संचालकांचा शब्द दिला होता. आता त्याची पूर्तता करण्यासाठीच कोरे यांनी सत्ताधाऱ्यांशी संधान साधले आहे.‘आमचं ठरलंय’ असे म्हणत लोकसभा निवडणुकीपासून महाडिकांना जोरदार धक्के देणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांची वज्रमुठ बांधण्यास सुरुवात केली होती. लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही यश मिळाल्याने ‘आमचं ठरलंय आता गोकुळ उरलंय’ अशी घोषणा देत त्यांनी गोकुळ निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते.
गतवेळी क्रॉस व्होटिंगच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फुटला असल्याने सत्ताधाऱ्यांनी सुरुवातीपासून सावध भूमिका घेत ठराव गोळा करतानाच बऱ्यापैकी चित्र आपल्या बाजूने तयार करून घेतले आहे.कोरे गटाचे ठराव (अंदाजित)
- शाहूवाडी : ७०
- पन्हाळा : २५
- हातकणंगले : १०