कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत राज्यभर गाजलेली ‘आमचं ठरलंय’ हीच टॅगलाईन घेऊन ऋतुराज पाटील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरण्याची शक्यता ठळक झाली आहे. त्यांचा आज, शुक्रवारी वाढदिवस होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी शहरभर डिजिटल फलक लावून आता ‘ऋतुराज पाटील @ विधानसभेचे ‘उत्तर’ असा नारा दिला आहे.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा ‘कोल्हापूर दक्षिण’मधून मैदानात उतरण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे; त्यामुळे त्यांची त्या मतदारसंघातील उमेदवारी नक्की समजली जाते. ऋतुराज पाटील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत सक्रिय होते. लोकसभा निवडणुकीतही ते प्रचाराच्या जोडण्या लावण्यात पुढे होते; त्यामुळे ते या वेळेला मैदानात उतरणार का आणि उतरले तर कोणत्या पक्षातून याबद्दल उत्सुकता आहे. त्यांचे घराणे काँग्रेसमध्ये असले, तरी ऋतुराज पाटील यांचे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याशीही अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. भाजपकडूनही त्यांना आॅफर आहे; परंतु ते काँग्रेसमध्ये राहूनच करिअर करण्याची शक्यता जास्त ठळक आहे.
सर्वांशी आदबीने वागणारा आणि डोक्यात सत्ता न गेलेला तरुण अशी त्यांची लोकांतील प्रतिमा आहे. नव्या नेतृत्वाबद्दल लोकांत कायमच उत्सुकता असते; त्यामुळे त्यांनी ‘कोल्हापूर उत्तर’चा पर्याय निवडला तर चांगली हवा निर्माण करू शकतात. हा मतदारसंघ सोडून त्यांच्याकडे सध्या तरी विधानसभेचा दुसरा काहीच पर्याय दिसत नाही. फक्त एकाचवेळी काका-पुतणे विधानसभेच्या मैदानात उतरतील का? हाच कळीचा मुद्दा आहे. मात्र, ऋतुराज पाटील यांना विधानसभा निवडणूक खुणावत आहे, एवढे मात्र नक्की. या मतदारसंघात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आमदार असून, त्यांनीही जोरात तयारी केली आहे. शिवसेनेला मानणारा पारंपरिक मतदार व शिवसैनिक या बळावर आपणच हॅट्ट्रिक करणार, असा विश्वास ते व्यक्त करत आहेत.या आहेत जमेच्या बाजूया मतदारसंघात काँग्रेसला मानणारेकिमान ४० हजार मतदान आहे.कसबा बावड्यात ३० हजारांपर्यंत मतदान आहे.तरुण कार्यकर्त्यांची फौज त्यांच्यामागे आहे.डी. वाय. पाटील घराण्याची व आमदार सतेज पाटील यांचे राजकीय बळ त्यांच्या पाठीशी आहे.