कोल्हापूर : आमचं ठरलंय विकास आघाडीला राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी दिली आहे. ही नोंदणी केवळ महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आहे. आघाडीचे अध्यक्ष प्रमोद दिनकर पाटील हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे कार्यकर्ते असून लोकसभा निवडणुकीत मंत्री पाटील यांची आमचं ठरलंय ही टॅगलाईन चांगलीच गाजली होती.आमचं ठरलंय आघाडीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी राजकीय पक्षांची नोंदणी आदेश, २००९ नुसार आपल्या पक्षाची नोंदणी करण्याबाबतचा प्रस्ताव १५ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यापूर्वी जनतेकडून नोंदणीबाबत राजपत्रातील सूचना, हरकती मागवल्या होत्या.
याबाबत एकही हरकत आयोगाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे ह्यआमचं ठरलंय आघाडीह्ण हा पक्ष राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. याबाबत, पक्षाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.आमचं ठरलंयने लोकसभेचा निकाल फिरला!लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात उघड दंड थोपटले होते. आमचं ठरलंय या टॅगलाईनद्वारे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा जोरदार प्रचार केला होता. ही टॅगलाईन इतकी गाजली, की त्यामुळे लोकसभेचा निकाल फिरला होता.