कोल्हापूर : जिल्हा परिषदेत गेल्यावर्षी सत्ता स्थापन करताना आम्ही शब्द दिला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पदाधिकारी बदल होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
गोकुळ, राजाराम साखर कारखाना आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका लागणार असल्याने नेते त्यामध्ये गुंतणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ मिळेल, असा आशावाद जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना आहे. मात्र मुश्रीफ यांनी स्पष्टपणे ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील हे विदेशातून आल्यानंतर या हालचाली वेगवान होणार आहेत.
अध्यक्षपद नेमके कोणत्या पक्षाला, हे गुलदस्त्यात ठेवण्यात मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे हे दाेघेही याबाबत एकत्र बसल्यानंतरच चर्चेला सुरुवात होणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी पहिल्यापासून जी नावे चर्चेत आहेत, तीच कायम आहेत. जर अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले तर मग उपाध्यक्षपदासाठी तीच नावे पुढे येणार आहेत. याउलट जर अध्यक्षपद कॉंग्रेसकडेच राहिले, तर मग हीच नावे उपाध्यक्षपदासाठी येऊ शकतात.
यामध्ये जर काही अडचणी येऊ लागल्या, तर मग दोन्ही नेते त्यांना गोकुळच्या उमेदवारीचाही शब्द देऊ शकतात. राज्यात सत्ता असल्याने आणि हसन मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री, तर सतेज पाटील हे पालकमंत्री असल्याने पुन्हा सत्ता मिळवण्यात महाविकास आघाडीला काहीही अडचण नाही. त्यामुळे गोकुळ, राजाराम साखर कारखाना आणि जिल्हा बंक निवडणूक लागली म्हणून पदाधिकारी निवड पुढे जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
चौकट
पी. एन. यांच्या मागणीने गुंता वाढला
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आमदार पी. एन. पाटील यांनी भेट घेऊन राहुल यांना अध्यक्ष करण्याची मागणी केल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आधीच्या अध्यक्षांचा राजीनामा होण्याआधी राहुल यांच्यासाठी पवार यांच्याकडे शब्द टाकण्यातून पी. एन. पाटील यांनी काही प्रश्न निर्माण करून ठेवल्याचे मानले जाते.