यड्राव : झाडांना कोणता पक्ष नसतो, की जात नसते तरीही झाडे सर्वांना सर्व काही देतात. झाड आहे तर आपली वाढ आहे, या भूमिकेतून आम्ही जांभळीकर ग्रुपने वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचे ‘नावासाठी नाही, फक्त गावासाठी’ या कर्तव्यातून हाती घेतलेले काम आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार सिनेअभिनेते व देवराई सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी काढले.
जांभळी (ता. शिरोळ) येथील आम्ही जांभळीकर ग्रुपने उभारलेल्या ऑक्सिजन पार्क वर्षपूर्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले, गावाच्या भल्यासाठी काही तरी करण्याची ऊर्मी आजच्या तरुणाईमध्ये असायला हवी. ‘आम्ही जांभळीकर’ ग्रुपने झाडांसाठी गावात उभा केलेले काम अख्या महाराष्ट्राने आदर्श घेण्यासारखे आहे. गावातील ही ऊर्जा घेऊन आम्ही इतर ठिकाणी काम करू. यासाठी सह्याद्री देवराई कायम जांभळीकरांच्या सोबत असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रारंभी गावातील श्रीरंग मोरे याने दगडावर रेखाटलेल्या ‘आम्ही जांभळीकर’ या लोगोचे अनावरण, रोटरी क्लबने दिलेल्या पाच हजार लिटर पाण्याच्या टाकीचे लोकार्पण, नवीन पाच एकर क्षेत्रातील वृक्षारोपण कामाचा शुभारंभ असे विविध कार्यक्रम पार पडले.
यावेळी सुहास वायंगणकर, मनीष मुनोत, पंचायत समिती सभापती कविता चौगुले, भाऊ नाईक, पं. स. सदस्य संजय माने, अभय यळरूटे, संजयसिंह गायकवाड, विजयकुमार माळी, उपस्थित होते.
फोटो - १२०२२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जांभळी (ता. शिरोळ) येथे आम्ही जांभळीकर ग्रुपच्या ऑक्सिजन पार्क वर्षपूर्ती कार्यक्रमात सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुहास वायंगणकर, मनीष मुनोत उपस्थित होते.