विक्रम पाटील ।करंजफेण : भेटला ना कुणी सोबती, ना सखा, आम्हा आंधळ्यांचा देव पाठीराखा, डोळ्यांचा प्रवास आजन्म तमाचा, तरी रोज दिसे कवडसा तेजाचा, येथे वेळ कुणा कवटाळण्या दु:खा.... एका कवीने लिहिलेल्या या ओळी पन्हाळा तालुक्यातील कोतोली पैकी भाचरवाडी येथील पांडुरंग धोंडिराम रेडेकर (वय ९०) यांच्या अंध कुटुंबाला तंतोतंत लागू पडत आहेत.
जन्मापासूनच अंधार वाट्याला आलेल्या दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या धीरोदत्त अंध बापाची ही करूण कहाणी आहे. जो आयुष्यात कधीच खचला नाही, पिचला नाही. वाघासारखी दोन लेकरं नियतीच्या खेळाची शिकार बनलीत म्हणून तिला दोष न देता कणखरपणे जगत राहिला.
वाढत्या वयानुसार दृष्टीहीन झालेल्या पांडुरंग रेडेकर यांना चार अपत्ये. त्यातील दोन मुलींची लग्न होऊन त्या माहेरी गेल्या. परंतु दोन मुले जन्मत:च अंध असल्याने ती अविवाहित राहिली. पांडुरंग यांनी अंगात बळ असेपर्यंत पत्नीच्या साथीने काबाडकष्ट करून अंध मुलांचा सांभाळ केला, पण दहा वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले अन् ते एकटे पडले. सध्या वयामुळे ते दृष्टीहीन झाल्याने अंथरूणावर पडून आहेत. त्यामुळे जन्मजात अंध असलेले व पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून असलेले धनाजी (४०) व जगन्नाथ (५०) हे दोघे बंधू हवालदिल झालेत. पण येणाºया संकटाशी सामना करत जीवन जगायलाच हवं या सकारात्मक मानसिकतेतून ते जगण्याशी लढा देत आहेत. पण त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नसल्याने त्यांची जगण्याची लढाई खडतर बनली आहे.
धनाजी हा दररोजच्या वाटेवरील शेतातील जमेल तेवढी वैरण आणून गाईचा सांभाळ करत आहे. गोवºया स्वत: थापटून सरपण तयार करत स्वयंपाक बनवून नियतीच्या खेळाला न जुमानता जगण्याचा प्रयत्न करत आहे. शेजार मंडळी माणुसकीच्या नात्याने मदत करून त्यांना आधार देत आहेत. दृष्टी नसल्याने गाव व माणसं न पाहिलेल्या या कुटुंबाने अनेक वर्षे कोणताही सणवार साजरा केलेला नाही. संकटाच्या अशा भयानक परिस्थीतीत देखील वडिलांची प्रामाणिकपणे सेवा ते करत आहेत.
एकाच घरात तिघे अंध असल्यामुळे कुटुंबाला जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यांना शासनाच्या योजनांचा फायदा मिळत नसून समाजातील दानशूर मंडळींनी अशा व्यक्तींना मदत करून बापलेकांची आधाराची काठी होणे गरजेचे आहे. - राहुल रेडेकर, ग्रामस्थ