कोगनोळी : कोरोना महामारीमुळे अनेकांच्या जीवनात आर्थिक संकट उद्भवले आहे. त्या अनुषंगाने इतरही काही संकटे उद्भवली आहेत. त्या सर्व संकटांवर जय मिळविण्याचा दृढ संकल्प श्रीदत्त जयंतीच्या निमित्ताने करावा. जयंती म्हणजे जय मिळविणारी. जयंती म्हणजे जय प्रदान करणारी. श्री दत्त जयंती ही सर्वांच्या जीवनात जय मिळवून देणारी ठरावी, असे विचार परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने व्यक्त केले.
श्री क्षेत्र आडी येथील श्री दत्त देवस्थान मठात सायं. ५ वाजून ५ मिनिटांनी श्री दत्त जन्मसोहळा अत्यंत साधेपणाने संपन्न झाला.
यावेळी प. पू. परमात्मराज महाराज यांनी सांगितले की, ‘दृढसंकल्पाने असाध्य गोष्टीसुद्धा साध्य होऊन जातात. त्यामुळे आर्थिक संकटाने किंवा दुसऱ्या कोणत्याही संकटांनी खचून न जाता त्या संकटांवर जय मिळवणारच, असा प्रबळ आशावाद व प्रबळ प्रयत्नवाद उराशी बाळगणे गरजेचे आहे. २०२० साली तीव्र वेगाने आलेल्या संकटांना नामशेष करण्यासाठी आता २०२१ साली जास्त तीव्र वेगाने झटले पाहिजे. संकटांवर जय मिळवलाच पाहिजे. यावेळी श्री देवीदास महाराज, श्रीराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री चिदानंद महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री अमोल महाराज, श्री मारुती महाराज, श्री समाधान महाराज, श्री श्रीधर महाराज, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : श्री क्षेत्र आडी येथील श्री दत्त देवस्थान मठात श्री दत्त जन्मसोहळा अत्यंत साधेपणाने संपन्न झाला.