कोल्हापुरातील श्री सदगुरू विश्वनाथ महाराज, रूकडीकर ट्रस्टतर्फे संतोष आणि प्रीती गर्जे दाम्पत्याला परमपूज्य श्यामला सांगवडेकर यांच्याहस्ते ‘माऊली आनंदी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि मडके घडविणाऱ्या कुंभारची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी आनंदनाथ महाराज होते.
साडेतीन वर्षांच्या भाचीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आई-वडील नसलेल्या, वंचित मुला-मुलींच्या दु:खाची जाणीव झाली. त्यातून अशा मुला-मुलींचे संगोपन करण्याचे ठरविले. सात मुलांपासून सुरुवात केली. या कार्यात पुढे जाताना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या अनेक अडचणी आल्या. मात्र, जे घडतंय ते चांगल्याकरिता, असे समजून वाटचाल केली. आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर चांगली माणसे भेटली. त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा, आधाराच्या जोरावर आज सहारा, बालग्रामच्या माध्यमातून वंचित, अनाथ मुला-मुलींचे आयुष्य घडवित आहे. रूकडीकर ट्रस्टचा पुरस्कार आम्ही कृतज्ञतापूर्वक स्वीकारतो. वंचित, अनाथ मुला-मुलींना समाजाने आपलेसे मानले पाहिजे, असे संतोष गर्जे यांनी सांगितले. रूकडीकर ट्रस्टचे सामाजिक कार्य, उपक्रमात मोठे योगदान आहे. देव माणसात असल्याची प्रचिती गर्जे दाम्पत्याच्या कार्यातून येत असल्याचे निलोफर आजरेकर यांनी सांगितले. संतांच्या शिकवणीनुसार गर्जे दाम्पत्य जगत आहे. प्रत्येकाने माणसातील देव शोधावा, असे आनंदनाथ महाराज यांनी सांगितले. या कार्यक्रमात श्री विश्र्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटरचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर यांनी स्वागत केले. अंजली बदी यांनी स्वागतगीत सादर केले. भावना सांगवडेकर यांनी प्रास्ताविक केले. रामराया सांगवडेकर यांनी आभार मानले. आनंद मानधने यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
‘डॉन’ऐवजी १०७ मुलांचा पालक झालो
घरच्या बिकट परिस्थितीमुळे जास्त पैसे कमविण्याकरिता ‘डॉन’ होण्यासाठी मुंबईला गेलो. अनाथ मुला-मुलींच्या दु:खाची जाणीव झाल्याने ‘सहारा’ची सुरुवात केली. त्याव्दारे आज मी आणि प्रीती १०६ मुला-मुलींचे पालक झालो असल्याचे गर्जे यांनी सांगितले.
फोटो (१२०२२०२१-कोल-माऊली आनंदी पुरस्कार) : कोल्हापुरात शुक्रवारी श्री सदगुरू विश्वनाथ महाराज-रूकडीकर ट्रस्टतर्फे गेवराई येथील संतोष आणि प्रीती गर्जे दाम्पत्याला परमपूज्य श्यामला सांगवडेकर यांच्याहस्ते ‘माऊली आनंदी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी डावीकडून रामराया सांगवडेकर, आनंदनाथ सांगवडेकर, निलोफर आजरेकर, भावना सांगवडेकर उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)