कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता नियमावलीसह मार्गदर्शक तत्त्वे देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासोबत बैठक घेऊन लवकरच प्रसिद्ध केली जातील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी रविवारी दिली.
नाईकवडे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील मंदिरे ७ ऑक्टोबरपासून उघडण्याबरोबरच नियमावलींचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचे पालन करण्याबरोबरच अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवासाठीही नियमावली प्रशासनाकडून केली जाणार आहे. यामध्ये गतवर्षीप्रमाणे मंदिरातील पूर्व दरवाज्यातून प्रवेश दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडणे, मंदिर परिसरातील दुकानदारांना द्यावयाच्या सूचना, श्रीपूजकांची संख्या या सर्व गोष्टींबाबत जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाशी चर्चा करून नियमावली प्रसिद्ध करण्यात येईल.