सर्वांना न्याय देणारे तुमच्या मनातील सरकार राज्यात आणू, राहुल गांधींसमोर सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
By भीमगोंड देसाई | Published: October 5, 2024 02:23 PM2024-10-05T14:23:17+5:302024-10-05T14:23:53+5:30
कोल्हापूर : कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून आणि मणिपूर ते मुंबईपर्यंत न्याय यात्रा काढून महिला, युवक, शेतकऱ्यांना ...
कोल्हापूर : कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारत जोडो यात्रा काढून आणि मणिपूर ते मुंबईपर्यंत न्याय यात्रा काढून महिला, युवक, शेतकऱ्यांना आधार देणारे काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या मनातील, न्याय विचाराचे सरकार महाराष्ट्रात आणू, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयाच्या उदघाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमातील प्रास्ताविकात त्यांनी खासदार गांधी यांना हे आश्वासन त्यांच्या उपस्थितीतच दिले. यावेळी गांधी यांनीही हसून त्यांना दाद दिली.
आमदार पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष आहे. या वर्षातच कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होते हे विशेष आहे. कसबा बावडा ही राजर्षी शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. या भूमीत अठारा पगड जातींच्या कल्याणासाठी उत्तुंग कामगिरी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण न्याय, समता, निर्भयतेसाठी लढणारे राहूल गांधी यांच्या हस्ते होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो, न्याय यात्रेच्या माध्यमातून भयभयीत झालेल्या घटकाला आधार दिला. त्यांच्या मनातील सर्वांना न्याय देणाऱ्या विचाराचे सरकार राज्यात आणू.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याकाळात अन्यायाविरोधात आवाज उठवला. सर्वांना बरोबर घेवून धर्मनिरपेक्षतेची विचारधारा रूजवली. पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा सातत्याने मिळत राहील.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा क्षण सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कसबा बावड्यात, कोल्हापुरात दिवाळी साजरी होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांचे भाषण झाले.