ढालगाव : युतीच्या काळात सुरू केलेल्या सिंचन योजना आमचेच सरकार पूर्ण करणार असून, रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.म्हैसाळ उपसा सिंचन योजना व टेंभू सिंचन प्रकल्पांतर्गत ढालगाव वितरिका, कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव सिंचन तसेच जत तालुक्यातील अंकले व खलाटी सिंचन योजना, खानापूर तालुक्यातील भूड येथील पंपगृह कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे झाले. यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले की, टेंभू-म्हैसाळ सिंचन योजनेची कामे १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरू झाली होती. आता ती कामे आमचेच सरकार पूर्ण करणार आहे. गेल्या पंधरा वर्षांत योजनांसाठी किती खर्च केला व योजना किती पूर्ण झाल्या, हे आपण सांगण्याची गरज नाही. त्या योजनांची चौकशी तर होईलच. हे वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यांनी सुरू केलेल्या या योजनांतील ढालगाव वितरिका, टप्पा क्र. ६ व टप्पा क्र. ६ ब तसेच यांच्यासह सहा प्रमुख कामांची सुरुवात ताकदीने केली आहे.जत तालुक्यातील ४२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवू. घाटनांद्रे-तिसंगी योजनेचे काम तांत्रिक अडचणीमुळे लांबले आहे. ते येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे, पारदर्शी कारभार करणारे आहे.मराठा, धनगर आरक्षणाबाबत ते म्हणाले की, या अगोदरच्या आघाडी सरकारने आरक्षणाचे चुकीचे अहवाल केंद्र शासनाकडे पाठविले होते. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला.खासदार संजयकाका पाटील यांनी जत तालुक्याचे विभाजन, टेंभू व म्हैसाळ पाणी योजना, जत तालुक्यातील ४२ गावांचा पाणी प्रश्न याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. या सरकारने राबविलेल्या चांगल्या योजनांचे कौतुकही त्यांनी केले. आ. विलासराव जगताप यांनीही जत तालुक्याच्या समस्या सोडविण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला. चंद्रकांत हाक्के यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार पणन व वस्त्रोद्योग, पालकमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. सुरेश खाडे, अनिल बाबर, रमेश शेंडगे, पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे-म्हैसाळकर, श्रीकांत देशमुख, सभापती वैशाली पाटील, दादासाहेब कोळेकर, अनिल शिंदे, अनिल लोंढे, मिलिंद कोरे, औदुंबर पाटील, हायूम सावनूरकर, काकासाहेब आठवले, दिलीप ठोंबरे, अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, के. डी. शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)दिलेली आश्वासनेकवठेमहांकाळ, जत, सांगोला, तासगाव, आटपाडी, खानापूर तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणू. अग्रणी नदी बारमाही करू.सूक्ष्मसिंचनाला चालना देऊन उत्पादन वाढीचा प्रयोग यशस्वी करू.सूक्षसिंचनासाठी अनुदान देणार आहे.
सिंचन योजना आम्हीच पूर्ण करणार
By admin | Published: December 31, 2016 11:18 PM