लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या मुशीतच आम्ही तयार झालेलो असल्याने त्यांच्या विचारानेच ‘गोकुळ’चा कारभार करत असताना दूध उत्पादकांना दोन रुपये जादा दर देण्यास बांधील आहे. करवीरमधील ठरावधारकांचे पाठबळ पाहता, येथेच सत्तारूढ आघाडीला पराभूत करू, असा विश्वास ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
करवीर तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात तब्बल ४३० ठरावधारक उपस्थित होते. सत्तारूढ गटाच्या कारभाराचे वाभाडे काढत अरुण डोंगळे म्हणाले, आनंदराव पाटील-चुयेकर यांनी मल्टीस्टेटचा मुद्दा सभासदांसमोर मांडला असता तर त्याला डोळे झाकून मान्यता दिली असती. मात्र या नेतृत्वावर सभासदांचा विश्वास नसल्यानेच कडाडून विरोध झाला. खासदार, आमदारकी गेली तरी त्यांच्यात बदल झाला नाही.
माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, शेणामुतात राबणाऱ्या महिला भगिनींच्या पदरात चार पैसे जादा पडावेत, उत्पादकांचा ‘गोकुळ’ राहिला पाहिजे, ही भूमिका आनंदराव पाटील-चुयेकर यांची राहिली. त्यामुळेच आपण मल्टीस्टेटला कडाडून विरोध केला, भले त्याची राजकीय किंमत मोजावी लागली असली तरी आज सभासदांना त्यांच्या मताचा हक्क देऊ शकलो, याचे समाधान आहे.
वासाच्या दुधातून २० कोटी
काही मंडळी ‘गोकुळ’ ३, १३, २३ तारखेला दुधाची बिले देतो म्हणून सांगतात; मात्र उत्पादकांचे वासाचे म्हणून काढलेल्या दुधापोटी २० कोटी रुपये मिळतात, हे सांगितले जात नाही. ‘गोकुळ’चा ब्रॅण्ड कोट्यवधीचा आहे, मात्र दुर्दैवाने त्याचा फायदा करता आला नाही. विश्वास पाटील हे अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यापासून प्रशासन हातातून सुटले असून ४ टक्क्यांनी दुधाची प्रत घसरल्याची टीका अरुण डोंगळे यांनी केली.
चंदगड विभागातील ६५० ठराव बाजूने
चंदगड, आजरा, गडहिंग्लजबाबत कोणी काही बोलले तरी तेथील सभासद स्वाभिमानी आहे. त्यामुळे काळजी करू नका, ८५० पैकी ६५० ठराव शाहू शेतकरी आघाडीच्या पाठीशी असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.
ठरावधारक स्वाक्षरी करूनच आत
करवीरमध्ये सर्वाधिक मतदान आहे. त्यात ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी सत्तारूढ गटापासून फारकत घेतल्यानंनर ठरावांच्या संख्येवरून दावे-प्रतिदावे झाले. मात्र आजच्या मेळाव्याला ठरावधारकाला स्वाक्षरी करूनच आत घेतले. त्यातून पाटील, चंद्रदीप नरके व सतेज पाटील यांनी आपली ताकद दाखवून दिल्याची चर्चा होती.
पन्हाळ्याची काळजी मिटली
मागील निवडणुकीत पन्हाळ्यात आम्ही २५० मतांनी मागे होतो, ते मताधिक्य तुटले नव्हते. आता आमदार विनय कोरे व चंद्रदीप नरके यांच्यामुळे ताकद वाढली असून काळजी मिटल्याचे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
‘महाडिक’ दूध संघ असा असता
मल्टीस्टेट झाला असता तर ‘गोकुळ’ऐवजी महाडिक दूध संघ असे झाल्याचे पहावयास मिळाले असते. पॅनलच्या नावात किमान कंसात तरी शेतकऱ्याचा उल्लेख करतील असे वाटत होते; मात्र आता त्याऐवजी कंसात ‘व्यापारी’ असे लिहिलेले पहावयास मिळेल, अशी टीका मंत्री पाटील यांनी केली.