लोकमत न्यूज नेटवर्क
कोगनोळी : सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला निघालेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा ताफा कोगनोळी येथील टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांनी अडवून परत पाठवला.
सीमा लढ्यांतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे बेळगावच्या दिशेने निघाले होते. त्यांचा ताफा कोगनोळी येथील टोलनाक्याजवळ आला असता कर्नाटक पोलिसांनी अडवला. कर्नाटकात प्रवेश करू न देता परत मागे पाठवला. पोलिसांच्या या कारवाईविरोधात यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव आणि सीमा भागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू आणि बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करू. आम्ही हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असे यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले.
मागील वर्षीही केली होती अडवणूक
मंत्री यड्रावकर हे मागील वर्षीही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावच्या दिशेने निघाले होते. त्यावेळीही त्यांना कोगनोळी येथील टोल नाक्यावर अडवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी इतर मार्गांचा अवलंब करत बेळगावपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले होते. त्यानंतर त्यांना तिथून महाराष्ट्राच्या हद्दीत आणून सोडण्यात आले होते.
पोलिसांशी बाचाबाची
कर्नाटक शासनाच्या एएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने मंत्री यड्रावकर यांना ही आमची हद्द आहे, तुमच्या हद्दीत जाऊन तुम्हाला जे काय करायचे ते करा, असे म्हटल्याने थोडा वेळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मंत्री यड्रावकर यांची समजूत काढली.
फोटो ओळ : सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावच्या दिशेने निघालेले मंत्री यड्रावकर यांना कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी अडवले.
छाया : बाबासो हळीज्वाळे