लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आर. टी. ई.) मधील शिक्षक निश्चिती निकषांमध्ये आवश्यक बदल करावा, सर्वच उच्च प्राथमिक शाळांना विनाअट मुख्याध्यापक व इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना किमान तीन शिक्षक मिळावेत, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार मंडलिक यांची भेट घेऊन विविध मागण्या केल्या. आर.टी.ई निकषानुसार २५ ते ३० टक्के शाळांमध्येच पात्र मुख्याध्यापक पद मंजूर असल्याने उर्वरित शाळा या मुख्याध्यापक विना सुरू आहेत. यासाठी उच्च प्राथमिक शाळांना विनाअट मुख्याध्यापक पद मंजूर व्हावे, अशी मागणी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केली.
आर टी ई ॲक्टनुसार इयत्ता पहिली ते चौथी वर्गाच्या प्राथमिक शाळांना इयत्ता पाचवीचा वर्ग विनाअट जोडावा व सातवीचा वर्ग असलेल्या शाळांना आठवीचा वर्ग विनाअट जोडण्याचे निर्देशही संबंधितांना लवकर व्हावेत. अशी मागणीही या वेळी करण्यात आली. शिष्टमंडळात राज्य संघटक पी. आर. पाटील, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, शंकर पवार, आर. एस. पाटील, नामदेव पाटील, संजय चव्हाण, बाळनाथ डवरी, नंदकुमार जाधव, रंगराव वाडकर, पांडुरंग घुगरे, प्रशांत गायकवाड सहभागी होते.
फोटो ओळी : पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन खासदार संजय मंडलिक यांना देण्यात आले. या वेळी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, पी. आर. पाटील, एस. के. पाटील आदी उपस्थित होते. (फाेटो-०७०९२०२१-कोल-पुरोगामी)