लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लावून पाठपुरावा करू, असे आश्वासन उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी दिले.
शासन निर्णयानुसार २००५ पासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदान निवृत्तीवेतन योजना स्तर-१, स्तर-२ चालू केली आहे. नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ही आता राष्ट्रीय निवृत्ती योजनेमध्ये हस्तांतरित झाली आहे. त्यानुसार नगरपालिका कर्मचारी हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर्मचारी असल्याने त्यांची आस्थापनाही नगरपालिकेकडे आहे. तसेच जे कर्मचारी राज्य संवर्गातून निवृत्त झाले आहेत, त्यांना राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू केली आहे. मात्र, अद्यापही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच कर्मचाऱ्यांना या योजनेविषयी कोणतीही माहिती नसल्याने वाल्मीकी मेहतर समाज संघटनेचे शिष्टमंडळ पोवार यांना भेटले. त्यावेळी पोवार यांनी वरीलप्रमाणे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांच्या ५१४ कर्मचाऱ्यांची वेतनातून कपात झालेली जवळपास २२ कोटी रुपये सुरक्षित आहे. या योजनेची सविस्तर माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घोरपडे नाट्यगृह येथे कार्यशाळा आयोजित केली जाईल. तसेच ग्रामविकास विभागाच्या धर्तीवर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान पीआरएम नंबर रजिस्टर करणे, या मागण्यांसंदर्भात आवश्यक तो प्रस्ताव शासनाकडे पाठवू, असे त्यांनी सांगितले.