कोल्हापूर : मराठा समाजाला आठवड्याभरात आरक्षण देण्यासाठी सर्व स्तरावर सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानंतर समाजाला मागासवर्गीय ठरवून विशेष अधिवेशनाद्वारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी दिली. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करु नये यासाठी त्यांना कोणी ट्रॅप केले हे त्यांनी सांगावे असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरात झालेल्या स्वच्छता उपक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करू नये यासाठी मंत्री गिरीष महाजन, आमदार बच्चू कडू यांनी प्रयत्न केले. राज्यात ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी दाखले दिले जात आहेत. फक्त सगे सोयरे कोण हा मुद्दा होता, यावरही समाधान करण्याचा प्रयत्न आहे.
अनेकदा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कुणबी पुरावे मिळालेल्यांना दाखले दिले जात आहेत. ओबीसी आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. त्यामुळेच मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. विशेष अधिवेशनात आरक्षण दिले जाईल.जरांगे पाटलांनी रिस्क घेऊ नये..तब्येत ठीक नसतानाही जरांगे पाटील उपोषण करत मुंबईला जात आहे या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, मागील उपोषणामुळे त्यांची प्रकृती ठीक नाही अशाच त्यांनी चालत उपोषण करून मुंबईला येऊ नये. त्यांनी कोणत्या प्रकारे रिस्क घेऊ नये.