कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओची मालकी बदलली आहे, पण हा स्टुडिओ शासनाने ताब्यात घ्यावा, अशी मागणी होत आहे. म्हणून तो ताब्यात घेऊन स्टुडिओच कायम ठेवावा की तिथे चित्रनगरीचा एक भाग सुरू करणे अपेक्षित आहे. यासाठी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊ, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी दिली.
ते म्हणाले, जयप्रभा स्टुडिओ सिनेसृष्टीसाठीच वापरात असावा, अशी पहिल्यापासूनच अनेक लोकांची मागणी आहे. कोरोनामुळे लता मंगेशकर यांना भेटता आले नाही. दरम्यान, त्यांचे निधन झाले. त्यांनतर त्यांच्या स्मृती जयप्रभामध्ये जपली जावी, अशी सर्वांनीच सूचना मांडली, पण जयप्रभाची विक्री यापूर्वीच झाल्याचे समोर आले. त्याची मालकी बदलली आहे. यामुळे आता या स्टुडिओबद्दल शासन पातळीवर काय करता येईल, हेरिटेजमध्ये असल्याने किंमत ठरवून पुन्हा जयप्रभा ताब्यात घेण्यासंबंधी विचार केला पाहिजे.आता स्टुडिओची विक्री कशी झाली, ती कायदेशीर की बेकायदेशीर याच्या मागे आता जाणे उचित होणार नाही. पुढील काळात स्टुडिओ पुन्हा ताब्यात कसा घेता येईल, यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. यासंबंधी विकत घेतलेल्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. व्यवहार आणि व्यवसाय दोन गोष्टी आहेत. व्यवसाय करण्याचा अधिकार नेत्यांच्या मुलांनाही आहे. यावर आता राजकीस वाद घालत बसण्याऐवजी वाद मिटवून पुन्हा जयप्रभा स्टुडिओची जागा कशी परत घेता येईल, हे महत्त्वाचे आहे.
घरांसाठी महापालिकेतर्फे मदत
पंतप्रधान आवाससह विविध योजनेतून शहरातील गरजूंना घर देण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. शहरातील विविध झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड देणे, जागा नावावर करणे अशा मागण्या आहेत. यावरही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
शेट्टींचा गैरसमज
माजी खासदार राजू शेट्टी यांचा वीज दरासंबंधी गैरसमज झाला आहे. शासनाने वीज दरात सुसूत्रता आणण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशीच आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.