कोल्हापूर : गणेशोत्सवासोबत शिवसेना तसेच सवर्सामान्यांच्या भावना जोडल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदी हटविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत आपण लवकरच राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कुंभार समाजाच्या शिष्टमंडळास दिली.प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरील बंदी हटवण्यासाठी बुधवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कुंभार बांधवांनी मंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी कुंभार समाजावर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली.यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले, दोन वर्षात महापूर आणि कोरोनामुळे कुंभार बांधवांवर कर्जाचा डोंगर झाला आहे. गणेशोत्सव ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये असला तरी त्याची पूर्वतयारी वर्षाच्या सुरवातीला करावी लागते. गणेश मूर्ती बनविण्यासाठी माती उपलब्ध होत नसल्याने मूर्ती सुबक आणि दर्जेदार बनण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस हेच एक माध्यम आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये केमिकल्स नाहीत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही, असे पुरावे आहेत. हरित लवादानेही सन २०१३ मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होत नसल्यास मान्यता दिली आहे. तरी प्लास्टर वापरावरुन कुंभार समाजावर कारवाई करू नये, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठवावी.यावेळी माजी महापौर मारुतीराव कातवरे, संभाजी माजगावकर, अनिल निगवेकर, सतीश बाचणीकर, रवी माजगांवकर, सुनिल माजगांवकर, शिवाजीराव वडणगेकर, पुणे कुंभार समाजाचे प्रवीण बावदणकर, पेण कुंभार समाजाचे अभय म्हात्रे, कैलास पाटील, हेमंत कुलकर्णी उपस्थित होते.