लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी संघाचा नावलौकिक संपूर्ण आशिया खंडात होता. संघाच्या कारभाराला आर्थिक शिस्त लावत गतवैभव प्राप्त करून देऊ, असा विश्वास शेतकरी संघाचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अमर शिंदे यांनी व्यक्त केला. त्यांनी बुधवारी प्रशासक म्हणून पदभार घेतला, त्यावेळी बाेलत होते.
अमर शिंदे म्हणाले, सुरुवातीच्या टप्प्यात आढावा घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्यांना चाप लावून संघाची घडी बसवावी लागणार आहे. संघ ही आपली मालमत्ता आहे, या भावनेतून कर्मचाऱ्यांनी काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या वेळी संघाचे प्रभारी व्यवस्थापक सचिन सरनोबत यांनी त्यांचे स्वागत केले. विभागप्रमुखांची बैठक घेऊन अमर शिंदे यांनी संबधितांना सूचना दिल्या. सहकार अधिकारी श्रेणी-१ मिलिंद ओतारी, कार्यालयीन अधीक्षक उदय उलपे, चिटणीस अजिंक्य डांगे, भगवान पाटील, धनाजी देसाई, दीपक देसाई, अनंत देसाई, रुक्साना जमादार, रणजित खानविलकर, युनियनचे सचिव दीपक निंबाळकर आदी उपस्थित होते.
तात्यासाहेबांना अभिवादन करून पदभार
अमर शिंदे यांनी सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
अंतर्गत लेखापरीक्षक, शाखानिहाय आढावाने सुरुवात
पेट्रोल, खत, इस्टेट आदी विभागांचा रोज आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर तातडीने अंतर्गत लेखापरीक्षण करून वस्तुस्थितीची माहिती घेऊन पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत रोज अमर शिंदे व प्रदीप मालगावे येथे बसणार आहेत.
फोटो ओळी : शेतकरी सहकारी संघाचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अमर शिंदे यांनी बुधवारी संघाचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब मोहिते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पदभार स्वीकारला. या वेळी संघाचे प्रभारी व्यवस्थापक सचिन सरनोबत, उदय उलपे, मिलिंद ओतारी उपस्थित हाेते. (फोटो-१४०७२०२१-कोल- शेतकरी संघ)