कोल्हापूर : टोलविरोधी कृती समितीच्या कार्र्यकर्त्यांवरील टोल आंदोलनातील खटले मागे घेण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी ते घेतलेले नाहीत. ते पूर्ण करावे, अन्यथा त्यांच्या विरोधात नाईलाजास्तव गनिमी काव्याने आंदोलन करू, असा इशारा टोलविरोधी कृती समितीने दिला.राज्यशासनाने आय. आर. बी. कंपनीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरावर लादलेला टोल हटविण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेने पाच वर्षे रस्त्यावर उतरून टोलविरोधी कृती समितीच्या माध्यमातून लढा दिला. या जनआंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या आंदोलनांत पोलिसांनी खटले दाखल केले आहे. ते आजही न्यायालयात प्रलंबित आहेत. यात कार्यकर्त्यांना न्यायालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. काहींवर रोख दंडात्मक कारवाईही झाली आहे.शासनाने आय. आर. बी. कंपनीला ४०० कोटी रुपये भागविले आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरकरांच्या वतीने भव्य सत्कार करून आभार मानले होते. यावेळी टोल आम्ही रद्द केला आहे.
जनआंदोलनातील कार्यकर्त्यांवरील खटले शासन मागे घेणार, अशी घोषणा केली, तसे शासन परिपत्रकही काढले; पण अद्यापही काहीच कारवाई झालेली नाही. त्यानंतर बऱ्याचवेळा मुख्यमंत्र्यांना निवेदन व स्मरणपत्रेही दिली आहेत. वारंवार पालकमंत्री पाटील यांना विनंतीही केली आहे; त्यामुळे आम्हा आंदोलकांना वेगळीच शंका येत आहे.
सनदशीर व लोकशाही मार्गाने आंदोलने पुन्हा कोणी करू नयेत म्हणून हे खटले मागे घेतलेले नाहीत; त्यामुळे आमच्यावरील खटले त्वरित मागे घ्या, अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करू, असे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर चंद्रकांत यादव, दिलीप देसाई, अशोक पोवार, रमेश मोरे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदींच्या सह्या आहेत.