कोल्हापूर : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेला सिग्नल उभारणी आणि इतर कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. दसरा चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नल उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्यातून शहरातील काही चौकात नवीन सिग्नलची उभारणी करण्यात आली.
ऐतिहासिक दसरा चौकातदेखील नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. ही कोंडी सोडविण्यासाठी नवीन सिग्नलची उभारणी करण्यात आली. या सिग्नलचे उद्घाटन शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, शहरातील गुन्हे रोखण्यासाठी सीसीटीव्ही आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवीन सिग्नलची उभारणी करण्यात आली. अजूनही महापालिकेला वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही नवीन उपाययोजना करायच्या असतील, तर तसा प्रस्ताव द्या, आपण भरीव निधी देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य कराव, असे आवाहन केले.यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, दिलीप पवार, राहुल माने, प्रताप जाधव, इंद्रजित बोंद्रे, महेश सावंत, अर्जुन माने, प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, दिग्विजय मगदूम, आदिल फरास, राहुल चव्हाण, मधुकर रामाने यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते..