सावरवाडी : डोंगरी भागाच्या विकासासाठी आमदार पी.एन. पाटील यांच्या आर्थिक फंडातून निधी खर्च केला जात आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या हिताकरिता विविध विकासकामांचे पर्व उभारू, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काँग्रेस सदस्य राहुल पाटील यांनी केले.
बहिरेश्वर (ता. करवीर) येथे आमदार पी.एन. पाटील यांच्या २५१५ फंडातून व जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष सातपुते यांच्या फंडातून सुमारे एक कोटी ८७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या आयोजित उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच युवराज दिंडे होते.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष सातपुते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत शासकीय निधीतून विकासकामे केली जात आहेत. आमदार पी.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांना प्राधान्य देण्यात येते.
कार्यक्रमात सरपंच युवराज दिंडे,
माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायतीचे उपसभापती अविनाश पाटील आदींची भाषणे झाली. यावेळी करवीर पंचायत सदस्या अर्चना खाडे, कुंभी कासारीचे माजी संचालक सीताराम पाटील, गोकूळचे जनसंपर्क अधिकारी पी. आर. पाटील, काँग्रेस नेते रघुनाथ वरुटे, शिवाजीराव चव्हाण मारुतराव दिंडे, भगवान दिंडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ
बहिरेश्वर (ता. करवीर) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष सातपुते, सरपंच युवराज दिंडे, करवीरचे उपसभापती अविनाश पाटील, पी. आर. पाटील उपस्थित होते.