कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या अभयारण्याकडे असलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करू, असे आश्वासन मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांनी गुरुवारी दिले.
श्रमिक मुक्तिदलाच्या वतीने गेल्या ३२ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू असून, याअंतर्गत आंदाेलकांनी बेन यांची भेट घेतली. यावेळी उपवनसंरक्षक आर. आर .काळे, वन अधिकारी विशाल माळी, एस. डी. गवते, एस. डी. निकम, वैभव पिलारे, श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने मारुती पाटील, शंकर पाटील, सुरेश पाटील, शामराव कोठारी, आकाराम झोरे, शामराव पाटील, कोंडिबा पवार, राजाराम शेलार उपस्थित होते.
यावेळी २१५ हेक्टर वन जमिनीची निर्वणीकरणाची अंतिम मंजुरी तातडीने घेणे, वन विभागाच्या कसणुकीलायक जमिनी १० दिवसांत प्रकल्पग्रस्तांना दाखवून पसंत्या घेणे आणि ३० दिवसांत याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविणे, निर्वाहभत्ता, ६५ टक्के रकमेवरील व्याज, घरबांधणी अनुदान, शौचालय अनुदान यासाठी मिळालेला १९ कोटींचा निधी तातडीने वाटप करणे यावर चर्चा झाली. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या गावठाणात नागरी सुविधा यांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कार्यकारी अभियंता वारणा कालवे विभागाला पत्र देणे, सोनार्लीच्या मूळ गावातील परस्पर वनखात्याकडे जमा झालेल्या जमिनींचा प्रस्ताव तयार करून प्रकल्पग्रस्तांना त्याचा मोबदला तातडीने देण्याचे ठरले. या मुद्द्यांची चर्चा होऊन कालबद्ध कार्यक्रम ठरला असला तरी प्रत्यक्ष कार्यवाही होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला.
--