कोल्हापूर : कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची रेल्वे सुरक्षा विभाग (पुणे) आयुक्त ए.के.जैन यांनी बुधवारी पाहणी केली. त्यांच्यासोबत असलेल्या पुणे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक रेणु शर्मा यांनी या मार्गावर येत्या काही दिवसांतच विद्युतीकरणाची रेल्वे सुरू होईल, अशा व्यक्त केली.यानिमित्त दुपारी एक वाजता विशेष निरीक्षण रेल्वेतून त्यांचे पथक कोल्हापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. यात अग्रभागी रेल्वेचे इलेक्ट्रीक लोको पायलट इंजिन होते. यावर ‘सीआरएस इन्स्पेक्शन आॅफ रेल्वे इलेक्ट्रीफीकेशन वर्क फार्म मिरज टू कोल्हापूर ’ असा फलक लावण्यात आला होता.
यात रेल्वे सुरक्षा विभाग (पुणे) आयुक्त ए.के.जैन, व्यस्थापिका रेणु शर्मा, पुणे विभागाचे सहायक व्यवस्थापक मिनल चंद्रा,वरिष्ठ आॅपरेटींग व्यवस्थापक गौरव झा यांच्यासह पुण्याहून ६० जणांची तंत्रज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले. तत्पुर्वी या पथकाने मिरजेपासून कोल्हापूरपर्यंत अशा ४८ कि.मी रेल्वे अंतर पूर्ण झालेले विद्युतीकरणाचे कामाचा आढावा घेतला.
या मार्गात येणारे पुल, रेल्वे क्रॉसींग, पुलांची उंची, रेल्वे स्टेशन, रूळाची स्थिती, भौगौलिक स्थिती आदींची पाहणी केली. विशेषत: तांत्रिक पथकातील तज्ज्ञांशीही चर्चाही केली. त्याचा सर्व अहवाल स्वत: रेल्वे पुणे विभागाचे सुरक्षा आयुक्त जैन हे करणार आहेत. तो मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे. त्यांनतर त्या अहवालानंतर कोल्हापूर ते मिरज हा विद्यूत रेल्वेमार्ग सुरू होणार आहे.
यासाठी लोकोपायलट हे वीजेवर चालणारे रेल्वे इंजिन धावणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास अवघ्या ४० मिनिटाचा होणार आहे. दरम्यान दुपारी १: ४० मिनिटांनी पुन्हा पुण्याकडे मार्गस्थ होताना या रेल्वे निरीक्षण पथकाने गाडीचा वेग ११० कि.मी. प्रतितास आणि ट्रॅकवरील रेल्वे रुळांची पाहणी केली. यावेळी स्थानक अधीक्षक ए.आय.फर्नांडीस, पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकातील कामकाजाची माहीती दिली.या रेल्वेना होणार विद्यूतीकरणाचा लाभराणी चन्नमा, कोल्हापूर-बंगळूर, हरिप्रिया एक्सप्रेस, कोल्हापूूर-तिरूपती, कोल्हापूर-हेदराबाद, कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर-बिदर या रेल्वेला विद्युतीकरणाचा लाभ मिळणार आहे. या रेल्वेला कोल्हापूरात येताना व जाताना डिझेल इंजिन बदलावे लागते. हा कालावधी कमी होणार आहे.