लोकमत न्यूज नेटवर्क
सरुड : राज्यात सध्या सुरु असलेल्या घडामोडीत आपण शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील - सरुडकर यांनी गुरुवारी दै. लोकमतशी बोलताना स्पष्ट केले .
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्यासह जिल्ह्यांतील पाच माजी आमदार गोवा सहलीवर गेले होते . यादरम्यान हे सर्व माजी आमदार नॉटरिचेबल होते . सत्यजीत पाटील यांच्यासह या सर्व आमदारांचे ना . एकनाथ शिंदे यांच्याबरोबर घनिष्ठ संबंध होते . त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडीत माजी आमदार सत्यजीत पाटील कोणती भूमिका घेणार याकडे शाहूवाडी - पन्हाळा तालुक्यातील शिवसैनिकांसह जनतेचे लक्ष लागुन राहीले होते . अखेर सत्यजीत पाटील यांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणार असल्याचे सांगत या विषयी सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.
त्याच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले , शिवसेना प्रमुख कै . बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मतदार संघातील शिवसेनेला मानणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच मी २००४ व २०१४ ला दोनवेळा आमदार झालो . गत निवडणूकीत माझा पराभव झाला असला तरी मतदार संघातील शिवसेनेला मानणारे हजारो कार्यकर्ते आजही आपल्या पाठीशी ठामपणे उभे असुन त्यांच्या पाठबळावरच यापुढेही आपली राजकीय वाटचाल कायमपणे सुरु राहील . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानत गेली १८ वर्षे आपण शिवसेनेशी प्रामाणिक पणे एकनिष्ठ राहीलो असुन यापुढे राज्यात काहीही राजकीय घडामोडी घडल्या तरी आपण उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी एकनिष्ठपणे राहणार असल्याचेही सत्यजीत पाटील यांनी शेवटी सांगितले .