कोल्हापूर - Sharad Pawar on BJP ( Marathi News ) भाजपने कितीही घोषणा केल्या तरीही सर्वेक्षणांचे जे कल आहेत ते पाहता लोकसभच्या निम्म्या जागा ‘इंडिया’आघाडी जिंकेल असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. ते बुधवारी सकाळी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रातील ज्या जागांबाबत काही ठरलेले नाही ते ठरवण्यासाठी उद्या महाविकास आघाडीची बैठक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, गेल्या काही दिवसात इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही. कारण त्या त्या राज्यातील प्रमुख आणि त्यांचे घटक पक्ष यांच्यात चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये काही वाद आहेत. शक्य त्या ठिकाणी समझोता व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत वरिष्ठांची बैठक होईल. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला व्यक्तिश फार आश्चर्य वाटले नाही. कारण श्वेतपत्रिकेत आदर्श प्रकरणाचा उल्लेख आल्यानंतर त्यांना ती धमकावणी वाटली आणि त्यांनी निर्णय घेतला. भाजप सत्तेचा कशा कोणत्या थराला जावून गैरवापर करतेय याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंदीगड महापालिकेचे आहे. परंतू अजूनही न्याय व्यवस्था निरपेक्ष असल्याने आम्ही आशादायी आहोत.
राहुल गांधी यांची पदयात्रेचा परिणाम कर्नाटकात दिसला आहे असे सांगतानाच पवार यांनी केंद्र शासनाच्या शेती व्यवस्थेची संबंधित धरसोड धोरणावर पवार यांनी टीका केली. मराठा आरक्षणाच्या टिकण्याबाबत माझ्या मनात शंका आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण उभे राहणार आहे हे अजून ‘त्यांनी’जाहीर केलेले नाही त्यामुळे त्याबाबत आत्ताच बोलणार नाही असे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.