कोल्हापूर : लग्नाची फूस लावून तरुणीला कोल्हापुरात सोडून गेलेल्या प्रियकराला शोधून एकटी संस्था व पोलिसांनी त्यांचे लग्न लावून दिले. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तिचे कन्यादान केले.एकटी संस्थेच्या कार्यकर्त्यांना सहा महिन्यांपूर्वी कविता (नाव बदलले) शहरात फिरताना दिसली. चौकशी केल्यानंतर लक्षात आले की दिल्लीतील युवकाने तिला फूस लावून कोल्हापुरात आणले आणि ती गरोदर असताना तिला इथेच सोडून तो फरार झाला. अखेर ती एकटी संस्थेत आली. या अवस्थेत बाळ नको असल्याने तीने बाळाला गर्भातच मारण्याचा प्रयत्न केला.
संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या साह्याने तिचे समुपदेशन केले. आपली फसवणूक झाली आहे. जन्माला येणाऱ्या बाळाचे भवितव्य काय या प्रश्नामुळे ती मानसिक त्रासात होती. शाहूपुरी पोलिसांनी तिच्या प्रियकराचा शोध सुरू केला. संस्थेतीलच दुसऱ्या पीडित महिलेला सोशल मीडियावरून कविताच्या प्रियकराचा संपर्क झाला. पोलिसी खाक्या दाखविताच प्रियकराने आपली चूक कबूल केली व तिच्यासोबत लग्न करण्याची तयारी दर्शविली.
पोलीस ठाण्यातच त्याने कविता व तिने जन्म दिलेल्या ‘सृष्टी’ या बाळाचा स्वीकार केला. पोलिसांनी रामाच्या दिल्लीतील कुटुंबीयांना बोलावून घेतले व संस्थेच्या कार्यालयात त्यांचा विवाह करून देण्यात आला.पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी कविताचे कन्यादान केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, उपाध्यक्ष संजय पाटील, विश्वस्त उज्ज्वल नागेशकर, डॉ. मंजुळा पिशवीकर, शैला पाटील, शैला आडूरकर, पुष्पा कांबळे, पुष्पा पठारे, माधुरी डिगे, शोभा पोवार उपस्थित होेत्या.