इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे धावपळ
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडी बुधवारी (दि. ६) होणार आहेत. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सचे पालन करत घोरपडे नाट्यगृहात निवडीची विशेष सभा होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. परंतु शहरातील बदलत्या राजकीय घडामोडींचा या निवडीवर काही परिणाम होणार का, त्यावर समीकरणे ठरणार आहेत.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार ६ जानेवारीला सकाळी अकरा वाजता प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली विषय समिती निवडीची सभा होणार आहे. त्यामध्ये सकाळी ११ ते १ विविध विषय समित्या व स्थायी समिती सदस्यांचे नामनिर्देशन, दुपारी १ ते ३ सभापती पदासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे नामनिर्देशन पत्र सादर करणे, दुपारी ३ ते ३.३० वाजता छाननी, ३.३० ते ४ वाजता माघार व त्यानंतर निवडी जाहीर करणे असा निवडणूक कार्यक्रम आहे.
सध्या भारतीय जनता पार्टी, आवाडे गट व मदन कारंडे गट यांची सत्ता आहे. त्यामध्ये राजर्षी शाहू आघाडी (कारंडे गट) व ताराराणी आघाडी यांच्यामध्ये फेरबदलाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.