कोल्हापूर : तापलेल्या सूर्याची अवकृपा बुधवारीही कायम राहिल्याने सलग दुसरा दिवस प्रचंड तापमानाचा ठरला. दुपारी तीन ते चार या वेळेत तापमानाने ४१ अंश सेल्सिअसवर उसळी घेतली. याचदरम्यान वारेही सुटल्याने उन्हाच्या झळांपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. आज, गुरुवारी आणखी तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट होणार असल्याने आणखी दिलासा मिळणार आहे; पण त्यानंतर ४ ते ११ एप्रिल या कालावधीत मात्र कोल्हापूरकरांना आजवरच्या सर्वोच्च तापमानाचा सामना करावा लागणार आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वेगाने वाढले आहे. मंगळवारी या हंगामातील सर्वोच्च ४० अंशांचे तापमान नोंदवले गेले. बुधवारीदेखील अशीच वाढ कायम राहत पारा ४० पार करून ४१ वर पोहोचला. साधारणपणे दुपारी पाऊणच्या सुमारालाच पारा ४० अंशांवर पाेहोचला. पुढे चारपर्यंत हीच परिस्थिती होती. त्यानंतर तापमान हळूहळू कमी होत ३८ अंशांपर्यंत खाली आले. रात्रीचे तापमानही १७ अंशांपर्यंत खाली आल्याने उकाड्याचा त्रास काही अंशी कमी झाला.
अंग भाजून काढणाऱ्या उन्हाचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. उन्हाचे चटके बसत असल्याने लोक बाहेर पडण्यासही धजावत नसल्याने दुपारच्या वेळेत रस्ते बऱ्यापैकी ओस पडल्याचे दिसत आहे. कष्टाच्या कामावरही मर्यादा आल्या असून, बऱ्यापैकी दुपारी कामे थंडावलेली दिसत आहेत. आधीच लॉकडाऊनच्या धास्तीने वातावरण गंभीर असताना आता या उन्हाने त्यात आणखी भर घातल्याने सर्वत्र त्राग्याचा सूर कानावर पडत आहे.
चौकट ०१
शेत शिवाराचे वेळापत्रक बदलले
कडक उन्हाचा परिणाम शेतीच्या कामावरही होत आहे. सध्या ऊस भरणीच्या आणि नांगरटीच्या कामाचा धडाका सुरू आहे; पण उन्हामुळे ही सर्व कामे पहाटे लवकर सुरू करून दुपारी १२ च्या आतच संपवली जात आहेत. पिकांची होरपळ वाढल्याने पाण्याचे फेरही वाढविण्यात आले असून, कृषी पंपांची घरघर अहोरात्र सुरू आहे.
चौकट ०२
तहान लागली म्हणून गार पाणी, गार पदार्थ खाण्याची किती इच्छा झाली तरी स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, अन्यथा ती आजारांना आमंत्रण ठरू शकतात. या काळात भूक आणि पचनशक्तीही मंदावलेली असल्याने पाणीदार फळे व भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. बर्फाचा वापर न करता सरबत व ज्यूस घेऊनच तहान शमविणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे.
डॉ. झुंझार घाटगे, जनरल फिजिशियन.
फोटो: ३१०३२०२१-कोल-उन्हाळा ०१
फाेटो ओळ : कोल्हापुरात वाढलेल्या तापमानामुळे वयोवृद्धांना रस्त्यावरून जाताना छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे. (छाया : नसीर अत्तार)