कोल्हापूर : केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्याने उद्या शनिवारपासून आठवडाभर कोल्हापुरात पाऊस मुक्कामालाच येणार आहे. तशी गुरुवारीदेखील तुरळक हजेरी लावली असलीतरी खरा जोर शनिवारपासूनच असेल, असे हवामान विभागाने कळवले आहे. आज शुक्रवारी देखील हलक्याशा सरी कोसळतील असाही अंदाज आहे.
जिल्ह्यात या वर्षी वेळेेआधी दोन दिवस माॅन्सून दाखल झाला असलातरी तसा पावसाचा जोर नाही. एखादं-दुसरी तुरळक सर येऊन जाते; पण आभाळ मात्र भरून आलेले आहे. काळेभोर ढग जमतात, हवेतही गारवा आहे, पण पाऊस नसल्याने कोल्हापूरकर सध्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान खात्याने शनिवार (दि.१२) पासून पाऊस जोर धरेल, असा अंदाज वर्तवला आहे. मंगळवार, बुधवारचा किरकोळ अपवाद वगळता पुढील शनिवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी होईल, असेही अंदाजात म्हटले आहे.
दरम्यान, पावसाचा अंदाज आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचा वेग वाढवला आहे. धूळवाफ पेरण्या बऱ्यापैकी पूर्ण होत आल्या आहेत. तरवे टाकण्याचेही काम अंतिम टप्प्यात आहे. यांत्रिक मशागतीची कामेदेखील शेवटच्या टप्प्यात आहेत.
पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली असून, गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक ४५ मिलिमीटर पावसाची नाेंद कुंभी जलाशयात झाली आहे. गगनबावड्यातील कोदे लघू पाटबंधारे प्रकल्पात ३४ तर, पाटगाव मध्यम प्रकल्पात ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कडवीमध्ये २५, तर तुळशीमध्ये २१ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. या तुलनेत राधानगरी, काळम्मावाडी, वारणा या जलाशयात अगदीच तुरळक पाऊस आहे. वारणेत तर पाऊसच नाही. राधानगरी ७ तर, काळम्मावाडी जलाशयात १४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
प्रमुख धरणातील आजचा पाणीसाठा
धरण उपयुक्त साठा (टीएमसीमध्ये) टक्केवारी
राधानगरी १.७१ २२
तुळशी १.५६ ४८
वारणा ६.७७ २५
काळम्मावाडी ६.२९ २६