कोल्हापूर : वीकेंड लॉकडाऊन असला तरी रविवारी दिवसभर शहर आणि परिसरात वाहनधारकांची वर्दळ कायम राहिली. पोलीस तपासणी आणि चौकशी असली तरी अत्यावश्यक सेवेचे कारण सांगून अनेक दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर दिसत होती. यामुळे लॉकडाऊन कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.लॉकडाऊन शिथिल केले असले तरी शनिवारी, रविवारी कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. वीकेंड लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले आहे. पण याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. निर्बंध असतानाही पहाटे शहरातील अनेक मैदाने आणि रस्त्यांवर मॉर्निंग वॉकर्स दिसत होते. शासकीय सुट्टी असल्याने अनेक नोकरदार खरेदीसाठी बाहेर पडले. गळ्यात शासकीय ओळखपत्र अडकवून भाजीपाला, फळे खरेदी करण्यासाठी ते आले होते.लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, महाव्दार रोड, मध्यवर्ती बसस्थानक, शिवाजी रोड, कसबा बावडा परिसरात काही प्रमाणात वाहनांची वर्दळ कायम राहिली. या भागात भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी स्टॉल लावला होता. रेनकोट, ताडपत्री, छत्री विक्रीची दुकानेही सुरू होती.
आठवडा बाजार असल्याने काही फिरस्ते रस्त्याकडेला थांबून विविध वस्तू विक्री करीत होते. वीकेंड लॉकडाऊनमुळे इतर दिवसांच्या तुलनेत ग्राहकांची गर्दी होती. अनेक विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसून होते. मिठाई, बेकरीचे साहित्य अर्धे शटर उघडून दुकानासमोर टेबल ठेवून अनेकजण विकताना दिसत होते. कारवाईची भीती असल्याने महापालिकेचे किंवा पोलिसांचे पथक येते का, याकडे नजर ठेवूनच त्यांचा व्यापार सुरू होता.