कोल्हापूर : जिल्ह्यात ज्या गावांमध्ये ५ पेक्षा जास्त रुग्ण आहेत त्या गावांत घरोघरी जाऊन कोरोना तपासणीची व्यापक मोहीम या आठवड्यात सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. या मोहिमेमुळे पॉझिटिव्ह रुग्ण समजतील व पूर्ण गावाची तपासणी झाल्याने कोरोना संसर्ग वाढणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकांनी या मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी प्रथमच संवाद साधला. ते म्हणाले, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ज्या गावांमध्ये ५ पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत त्या गावांची तालुकावार यादी तयार करण्यात आली आहे. या गावातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीचा स्त्राव घेतला जाईल. ती व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर कुटुंबातील सर्वांची तपासणी केली जाईल. मोठ्या गावांमध्ये तुलनेने रुग्ण कमी असतील. महापालिका क्षेत्रासाठी कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची तपासणी केली जाईल. या मोहिमेमुळे सुपरस्प्रेडर ठरणारे रुग्ण समजतील.
----
पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ नको..
जिल्ह्यात कोरोनास्थिती गंभीर असल्याने स्तर ४चे नियम लावावे लागले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा अडचणींचा सामना करावा लागला याची जाणीव आहे. आता परिस्थिती सुधारत असल्याने स्तर ३ अंतर्गत निर्बंध शिथिल केले आहेत, पण म्हणून नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, पॉझिटिव्ह रेटवर आम्ही लक्ष ठेवून आहोतच पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ देऊ नका अन्यथा पुन्हा निर्बंध लावण्याशिवाय प्रशासनाकडे पर्याय राहणार नाही. हातावरचे पोट असलेल्या गरीब, कामगार, सर्वसामान्य, रोजंदारीवर असलेल्या नागरिकांचा विचार करुन नियमांचे पालन करा.
--
कोल्हापूरचा जिल्हाधिकारी याचा आनंद..
ऐतिहासिक, पुरोगामी आणि सर्वार्थाने समृद्ध असलेल्या कोल्हापूरचा जिल्हाधिकारी म्हणून काम करायला मिळत आहे याचा मनस्वी आनंद असल्याच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले, या जिल्ह्याचा अनेक बाबतीत राज्य व देशासमोर आदर्श आहे. हा वारसा असाच समृद्ध ठेवू या.. कोल्हापूरच्या प्रतिमेला गालबोट लागणार नाही असा प्रयत्न आपण सर्व मिळून करू या..
दुसऱ्या डोससाठी ॲप
दुसरा डोस असलेल्या नागरिकांना लस उपलब्ध नसल्याने त्यांचे लसीकरण थांबले आहे, कोवीन ॲपचा मेसेज आल्याने केंद्रांवर गर्दी होते यावर ते म्हणाले, बीडमध्ये आम्ही दुसऱ्या डोससाठी जिल्हास्तरावर एक ॲप बनवले होते, ते आता कोल्हापुरातदेखील वापरण्यात येणार आहे. त्यादिवशी उपलब्ध असलेल्या लसीची संख्या विचारात घेऊन नागरिकांना कधी, कोणत्या केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी जायचे आहे हे मेसेजद्वारे कळवण्यात येईल.
---
पूरबाधित गावांचा आज आढावा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरबाधित होणाऱ्या गावांचा आज मंगळवारी आढावा घेण्यात येणार आहे. धरणातील पाणीसाठा, पुराचे नियोजन, बाधित होणाऱ्या गावांची लोकसंख्या, स्थलांतराची ठिकाणे, व्याधीग्रस्त नागरिक, ४५ वर्षांवरील, १८ वर्षांवरील नागरिक याचा विचार करुन डोसच्या उपलब्धतेनुसार लसीचा पहिला डोस दिला जाईल. शासनाकडेही बाधित होणाऱ्या गावांसाठी अधिक लसींची मागणी करण्यात आली आहे.
---
घरोघरी तपासणी होणारी तालुकानिहाय गावे..
करवीर : ७५
हातकणंगले : ५२
शिरोळ : ४३
कागल : ४०
पन्हाळा : ३५
राधानगरी : २३
शाहूवाडी : २२
आजरा : २१
भुदरगड : २०
गडहिंग्लज : १९
चंदगड : ०६
गगनबावडा : ०२
(आणखी ९ गावांचा यात समावेश आहे)