मार्च महिन्यात कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. शासन निर्देशाच्या आधारावर दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी अनुषंगाने राज्यात वीकएंड लाॅकडाऊनची घोषणा झाली. गर्दी टाळण्यासाठी शासन निर्देशान्वये पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत आठवडा बाजार बंद, ज्येष्ठ नागरिकांना मोफत लसीकरण, बाहेरील फिरस्ते व्यापारी यांना ठरावीक काळासाठी गावात यायला प्रतिबंध, आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेत असल्याची माहिती जुने पारगावचे सरपंच अरविंद पाटील, नवे पारगावचे सरपंच प्रकाश देशमुख, तळसंदेचे सरपंच अमरसिंह पाटील व वाठारच्या सरपंच तेजस्विनी वाठारकर यांनी दिली.
नवे पारगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. मौला जमादार, अंबपचे डाॅ. शैलेश गायकवाड, भादोलेच्या डाॅ. माहेश्वरी कुंभार यांनी गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा सक्तीने वापर, सॅनिटायझरचा वापर करून जवळच्या आरोग्य केंद्रातून कोरोनावरील मोफत लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.