कबनूर : शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून दत्तनगर भागातील आठवडा बाजार शुक्रवारी पूर्ण क्षमतेने पुन्हा एकदा भरला होता. याच भागात कोरोनाचे ६ रुग्ण सापडले असतानासुद्धा ना ग्रामपंचायत प्रशासनास गांभीर्य ना भागातील नागरिकांना नसल्याचे पूर्ण भरलेल्या बाजारावरून दिसत होते.
बाजार एकत्र भरणार नसून विक्रेत्यांनी सकाळी ७ ते ११ या कालावधीत ढकल गाडीवरून गल्लोगल्ली जाऊन शासनाच्या नियमानुसार मालविक्री करायचा आहे, असे असताना ग्रामपंचायत प्रशासनाने बाजार भरू का दिला, असा प्रश्न भागातील नागरिक करीत आहेत. ग्रामपंचायत सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियमावली ठरवली होती, असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा शुक्रवारी बाजार भरला गेला.
या भागातील कोरोना रुग्ण वाढू लागले तर जबाबदार कोण, बाजारामध्ये व्यावसायिक व ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सचा कोणताही वापर होत नसताना दिसत होते. तसेच अनेकांच्या तोडाला मास्क नव्हते. नागरिकांनीसुद्धा शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करावे,अशी मागणी होत आहे.
फोटो ओळी
२३०४२०२१-आयसीएच-०६
कबनूर (ता.हातकणंगले) येथील दत्तनगर भागात शासनाच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता बाजार भरला होता.