इचलकरंजी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी शहरातील १८ ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत बाजार भरविण्यात येणार असल्याचा निर्णय बुधवारी (दि.३१) झालेल्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, किरकोळ भाजी विक्रेता संघाच्या मागणीनुसार यात बदल करत सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे.
नगरपालिकेने सनियंत्रण समितीच्या बैठकीत आठवडी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजारांची ठिकाणे व वेळ याबाबतीत जो निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात किरकोळ भाजी विक्रेत्यांनी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांची भेट घेतली. सनियंत्रण समितीने ठरवून दिलेल्या १८ ठिकाणी व दिलेल्या कमी वेळेत बाजार भरविणे शक्य नाही. त्यामुळे यात बदल करावा, अशी मागणी विक्रेत्यांनी केली. त्यानुसार हा बदल जाहीर करण्यात आला. यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, सदा मालाबादे, सागर मुसळे, अमर सडगर, बजरंग डोईफोडे, पदाधिकारी व भाजी विक्रेते उपस्थित होते.