कोल्हापूर : राज्यात बंद झालेल्या संचांमुळे कमी झालेली विजेची उपलब्धता शिवाय गुजरात आणि मध्य प्रदेशातही बंद झालेले संच यामुळे विद्युत यंत्रणेची कंपनता (फ्रिक्वेन्सी) ४९.५ हर्टच्या दरम्यान राहिली. यामुळे आज, सोमवारी राज्यात सुमारे तीन ते सहा तासांचे भारनियमन करावे लागले. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाऊस वेळेत न आल्यास खबरदारी म्हणून कोयना धरणात आवश्यक पाणीसाठा असणे आवश्यक आहे. यामुळे निर्माण होणार्या आपत्कालीन स्थितीची शक्यता लक्षात घेऊन कोयनेचे पाणी राखून ठेवण्यात आलेले आहे. राज्यातील विजेचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी महावितरणने आज केंद्रीय पॉवर एक्स्चेंजमधून सुमारे १,२०० मे. वॅ. वीज शिवाय आपत्कालीन वीज खरेदीद्वारे २८५ मे. वॅ. वीज घेण्यात आलेली आहे. काल इंडिया बुल्सचा २७० मे. वॅ. व परळीचा २१० मे. वॅ.चा संच सुरू झालेला आहे. तरीही यंत्रणेत सुमारे २,००० मे. वॅ. ची तूट असल्याने भारनियमन करावे लागत आहे. उद्या, मंगळवारी अदानी ६६० मे. वॅ. चा संच कार्यान्वित होणे अपेक्षित असून, आजच्याप्रमाणे उद्याही एक्स्चेंजमधून जास्तीत जास्त वीज घेण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. अचानकपणे सुरू झालेले हे भारनियमन लवकरात लवकर संपवावे, यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. (प्रतिनिधी)
राज्यात भारनियमन
By admin | Published: June 03, 2014 1:02 AM