राम मगदूम ।गडहिंग्लज : बारसं म्हटलं की, डामडौल, गाजावाजा, पैशाची उधळपट्टी आदी गोष्टींची चर्चा होते, पण त्याला फाटा देत समाज ऋणातून उतराई होणारी मंडळी दुर्मीळच. यातीलच एक तनवडीचे राजाराम माने यांचे कुटुंबीय. त्यांनी आपल्या नातीचे ‘बारशे’ गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराने घालून ‘लेकी’च्या जन्माचे आनंदमयी स्वागत करून समाजासमोर नवा वस्तुपाठ ठेवला. नूल पंचक्रोशीसह गडहिंग्लज तालुक्यात याची विशेष चर्चा झाली.
त्यांनी मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील आपली मुलगी शीतल निगोंडा पाटील हिच्या कन्येचा नामकरण सोहळा सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनव पद्धतीने साजरा केला. त्यांनी गावातील सर्व जाती- धर्मातील शंभरीकडे वाटचाल करणाºया आणि गावाच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी बजावलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा हृद्य सत्कार केला. त्यांची कन्या शीतल ही पदवीधर असून जावई निगोंडा हे हैदराबाद येथील कंपनीत सेवेत आहेत.यानिमित्त बाबू काशाप्पा पाटील, जानबा बाळकू सुतार, शिवाप्पा नाना कदम, अर्जुन आण्णाप्पा जाधव, सदाशिव शिवाप्पा आरबोळे,
दुंडाप्पा पराप्पा आरबोळे, शंकर बाळाप्पा आरबोळे, पुंडलिक कृष्णा गायकवाड, ईश्वर रामा कांबळे, शारव्वा सुबराव आरबोळे, सत्यव्वा दुंडाप्पा तिगडी, दस्तगीर शेख, विरूपाक्ष देसाई आदी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार झाला. याप्रसंगी तब्बल ११५० लोकांना अन्नदान केले. याकामी मुगळीचे इरगोंडा पाटील, तनवडीच्या मृत्युंजय, अष्टविनायक, जयभवानी तरुण मंडळांनी विशेष परिश्रम घेतले.अनाथ आजोबाकडून संदेशमाने हे गडहिंग्लज साखर कारखान्यात नोकरीस आहेत. त्यांचा जन्म झाला त्याच क्षणाला त्यांची जन्मदात्री त्यांना सोडून गेली. मात्र, जन्मापासूनच आईच्या मायेला पोरक्या झालेल्या राजाराम यांना चन्नेकुप्पी येथील शिऊबाई सावंत यांनी ओट्यात घेतले. त्या अनाथ राजाराम यांनी नातीच्या आगळ्या बारशातून समाजाला नवा संदेश दिला.
‘लेक वाचवा’ला बळमुलगी झाली की, काही मंडळी नाराज होतात. वंशाचा दिवा म्हणून त्यांना मुलगा हवा असतो. त्यामुळे खोट्या प्रतिष्ठेसाठी समाजात विवाहितांचा छळ होत असल्याच्या घटना आपण नित्य अनुभवतो; परंतु आपल्याला एकुलती मुलगी असूनही तिलाही मुलगी झाल्यानंतर त्याबद्दल दु:ख न मानता राजाराम व कस्तुरी माने यांनी केलेल्या नातीच्या आगळ्या-वेगळ्या स्वागतामुळे शासनाच्या ‘लेक वाचवा’ अभियानाला कृतिशील बळ मिळाले आहे.
ज्येष्ठांच्या सत्काराने नातीचे बारशे..! तनवडी (ता. गडहिंग्लज) येथील राजाराम माने यांच्या कुटुंबीयांनी गावातील शंभरीकडे वाटचाल करणाºया ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून आपल्या नातीच्या जन्माचे स्वागत केले.