Ganesh Chaturthi 2018 : पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूरात गणरायाचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:21 PM2018-09-13T13:21:10+5:302018-09-13T15:28:43+5:30

ढोल- ताशासारख्या पारंपारिक वाद्यांचा गजर, लेझिम, झांजपथकांचा निनाद, दुसरीकडे बँड, बेंजो आणि सनईचे सूर, ‘गणपती बाप्पा मोरया,’ ‘गणेश गणेश मोरया’चा गजर, नऊवारी साड्यांचा मराठमोळा श्रृंगार ल्यालेल्या महिला, मुली; पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी, घरोघरी पंचपक्वान्नांचा दरवळ, खीर-मोदकांच्या प्रसादाचा थाट अशा थाटात गुरुवारी श्री गणरायाचे आगमन झाले.

Welcome to the celebration of Ganataya in Kolhapur during the traditional tunes | Ganesh Chaturthi 2018 : पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूरात गणरायाचे जल्लोषात स्वागत

Ganesh Chaturthi 2018 : पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूरात गणरायाचे जल्लोषात स्वागत

Next
ठळक मुद्देपारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूरात गणरायाचे जल्लोषात स्वागतप्रतिष्ठापना करण्यात मुली, महिलांचा फेटे घालून सहभाग

कोल्हापूर : ढोल- ताशासारख्या पारंपारिक वाद्यांचा गजर, लेझिम, झांजपथकांचा निनाद, दुसरीकडे बँड, बेंजो आणि सनईचे सूर, ‘गणपती बाप्पा मोरया,’ ‘गणेश गणेश मोरया’चा गजर, नऊवारी साड्यांचा मराठमोळा श्रृंगार ल्यालेल्या महिला, मुली; पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी, घरोघरी पंचपक्वान्नांचा दरवळ, खीर-मोदकांच्या प्रसादाचा थाट अशा थाटात गुरुवारी श्री गणरायाचे आगमन झाले.

गणपतीची स्तुती करणाऱ्या गीतांनी सकाळ सुरू झाली. दारात इंद्रधनुषी रंगांनी सजलेल्या रांगोळीचा गालिचा, घरादाराची साफसफाई झाल्यानंतर महिला श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी गव्हाची खीर, मोदकासह पंचपक्वान्नांचा नैवेद्य करण्यात गुंतल्या. बालचमू पारंपरिक वेशात सजून घरातील पुरुषांना व मोठ्यांना गणपतीच्या सजावटीसाठी मदत करीत होते.

वृद्ध माणसे प्रत्येक कामात सहकार्य करीत होती. एकीकडे घराघरांत ही लगबग सुरू असताना दुसरीकडे आपला देव घरी आणण्यासाठी आलेल्या भाविकांनी कोल्हापुरातील कुंभारवाडे गर्दीने फुलून गेले होते. फक्त शहरातीलच नव्हे तर कंदलगाव, पाचगाव, सरनोबतवाडी, नागदेववाडी अशा आसपासच्या गावांतूनही अनेक नागरिक कुंभारवाड्यांतून गणेश मूर्ती नेत होते.

लहान मुले, मुली, वयस्कर माणसे, महिला अशा कुटुंबासह आलेले भाविक फटाक्यांची आतषबाजी, बॅँड-बाजा, ढोल-ताशा पथक, सनईच्या सुरावटीच्या साथीने आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करीत श्री गणेशाची मूर्ती नेत होते. यानिमित्त पापाची तिकटी, कुंभार गल्ली येथे जाणारे महाद्वार रोड, गंगावेश, महापालिका आणि शिवाजी चौक हे रस्ते अन्य वाहनांसाठी बंद करण्यात आले होते.

पायी चालत श्री गणेशाला घरी नेतानाच अनेकांनी फुलांच्या माळांनी सजविलेली हातगाडी, रिक्षा, चारचाकी अशा वाहनांतून बाप्पांची स्वारी घरी आणली. फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर दारात उभारलेल्या सुवासिनींनी श्री गणरायाची दृष्ट काढत त्याचे औक्षण केले. रात्र-रात्र जागून खास बाप्पांसाठी तयार केलेल्या आराशीमध्ये बाप्पांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली.

पाच फळांची मांडणी, सुवासिक धूप-दीपाचा दरवळ, आरतीचे ताट, समईचा मंद प्रकाश, अभिषेक, प्रसाद, समोर पक्वान्नांचा नैवेद्य अशा थाटामाटात श्री गणेशाची पहिली आरती करण्यात आली. त्यानंतर कुटुंबीयांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. दुपारनंतर गणेश मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली.

प्रतिष्ठापना करण्यात मुली, महिलांचा फेटे घालून सहभाग

मुला-मुलींमधील भेदभाव न बाळगणाºया या राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरातील भूमीत महिला आणि मुलीही गणेशमूर्ती घरी नेण्यात आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात मागे नव्हत्या. पापाची तिकटी, शाहूपुरी, बापट कॅम्प या सगळ्या कुंभार गल्लीमध्ये सजून आलेल्या महिला मुली श्री गणेशाची मूर्ती नेत होत्या. त्यांच्याच हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठापनाही केली जात होती.

गजर पारंपरिक वाद्यांचाच

दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस प्रशासनाने मोठ्या आवाजातील ध्वनी यंत्रणेऐवजी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे, त्यानुसार श्री गणेशाच्या आगमनादिवशी पारंपरिक वाद्यांचाच गजर झाला. घरगुती गणेशासोबतच अनेक मंडळांनी बँड-बेंजो पथक, ढोल-ताशा, धनगरी ढोल अशा वाद्यांच्याच निनादात गणेशमूर्तींची मिरवणूक काढली.

Web Title: Welcome to the celebration of Ganataya in Kolhapur during the traditional tunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.