काेल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातूनच नववर्षाचे स्वागत करण्याची स्वागतार्ह भूमिका घेतली. सायंकाळपासूनच पोलिसांनी रस्त्यांवर उतरून तपासणी सुरू केल्याचे चित्र कोल्हापुरात गुरुवारी दिसून आले.
हॉटेल लवकर बंद करण्याच्या सूचना, जमावबंदीचा आदेश यांमुळे जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तंतोतंत पालन करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. त्यामुळे सायंकाळपासूनच सुमारे २०० हून अधिक पोलीस रस्त्यांवर उतरले होते. चारचाकी, दुचाकी गाड्यांची तपासणी, परवाना तपासणी यामुळे साहजिकच रात्री भरधाव जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी झाले होते. गेले तीन-चार दिवस पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याने त्याचाही फायदा झाला.
नागरिकांनी आपल्याच इमारतींच्या गच्चीवर आणि घरात सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत केले. मात्र, काही ठिकाणी फटाके उडविण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. त्यामुळे सायंकाळपासूनच फटाक्यांचे आवाज येत होते.
घरातच जेवणाचा फक्कड बेत किंवा हॉटेलमधून जेवण आणण्याचा पर्यायही अनेकांनी स्वीकारला. पोलीस तपासणीत परवाना नसणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. क्वचितप्रसंगी मद्यपान केलेलेही सापडले. त्यांना तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात नेण्यात येत होते. दसरा चौक, ताराराणी चौक, बसस्थानक परिसर, संभाजीनगर अशा मुख्य चौकांमध्ये ही तपासणी मोहीम अधिक कडक करण्यात आली. विविध वरिष्ठ पोलीस अधिकारीही बंदोबस्ताची पाहणी करीत होते.
३११२२०२० कोल इअर एन्ड ०१/०२
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळपासूनच कोल्हापुरात वाहनांची आणि परवान्यांची कडक तपासणी सुरू होती.
छाया - नसीर अत्तार