कोल्हापूर : ‘रन फॉर पीस’ दौड, वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत मनमोकळ्या गप्पा, व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक अशा विविध सामाजिक, विधायक उपक्रमांनी रविवारी शहरवासीयांनी नववर्षाचे स्वागत केले. ‘नवे वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो,’ अशा विविध शुभेच्छांच्या देवाणघेवाणीत अनेकांचा २०१७ या नव्या वर्षातील पहिला दिवस सरला.‘थर्टी फर्स्ट’निमित्त शनिवारी (दि. ३१) शहरातील उद्याने रात्री बारापर्यंत खुली होती. अनेकांनी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींसमवेत या उद्यानांसह रंकाळा आणि पंचगंगा नदीघाटावर सहभोजनाचा आस्वाद घेतला. शहरातील विविध हॉटेल्स, क्लबमध्ये मध्यरात्रीपर्यंत ‘थर्टी फर्स्ट’सह नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष रंगला होता. नव्या वर्षातील पहिल्या दिवसाची सकाळ शुभेच्छांच्या वर्षावामध्ये उजाडली. शहरवासीय प्रत्यक्ष भेटून, मोबाईलवरून एकमेकांना शुभेच्छा देत होते. बहुतांश नागरिकांनी करवीरनिवासिनी अंबाबाईसह अन्य काही मंदिरांमध्ये देवदर्शन करून दिवसाची सुरुवात केली. काही सामाजिक संस्थांनी नववर्षाच्या स्वागताला सामाजिक, विधायक उपक्रमांची जोड दिली. लक्षतीर्थ विकास फाउंडेशन संचलित नारायणी अभ्यासिकेतील मुलांनी चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत पूर्ण दिवस व्यतीत केला. त्यामध्ये मुलांनी नाटक, गाणी, नृत्याचे सादरीकरण केले. ‘वायएमसीए’ कोल्हापूर व ‘सिटीझन फोरम’तर्फे नवीन वर्षाच्या स्वागतसमयी विश्वशांती, बंधुत्व, एकता व आरोग्यदायी आयुष्यासाठी ‘रन फॉर पीस’ दौड आयोजित केली होती. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये संदीप थोरात यांनी प्रार्थना केली. त्यानंतर ‘रन फॉर पीस’ रॅलीची सुरुवात झाली. शाहू टर्मिनस येथील हनुमान मंदिर, शाहूपुरीतील बडी मस्जिद या ठिकाणीही विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या दौडीची सांगता वायएमसीए हॉल येथे राष्ट्रगीताने झाली. त्यामध्ये सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव, ‘वायएमसीए’चे अध्यक्ष अतुल रुकडीकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान उस्ताद, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आर. एल. चव्हाण, मुस्लिम पंचायतचे अध्यक्ष फारुख एम. कुरेशी, संग्राम पाटील-कौलवकर, विवेक रणनवरे, आनंदा म्हाळुंगेकर, रोहित शिंदे, हिंदू एकताचे शहराध्यक्ष जयदीप शिंदे, डॉ. मिलिंद वानखेडे, डॉ. जे. पी. पाटील, कोल्हापूर जिल्हा ख्रिस्ती संघाचे सचिन समुद्रे, अमोल चोपडे, आदी उपस्थित होते. कलानगरीत नववर्षाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने करण्याच्या उद्देशाने चित्रकार सुनील पंडित यांनी व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक हा उपक्रम राबविला. रंकाळा टॉवर येथे झालेल्या प्रात्यक्षिकात त्यांनी शिवशाहीर राजू राऊत यांचे चित्र रेखाटले.यावेळी ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे, एस. निंबाळकर, शिवाजी मस्के, रियाज शेख, सतीश पाटोळे, प्रा. सुनील भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)फेसबुक, व्हॉटस् अॅपवर संदेशाचा वर्षाव‘सगळे आले का रे २०१७ मध्ये? कुणी राहिलं तर नाही ना मागे’, अशा विविध गमतीदार संदेशांसह हॅपी न्यू ईअर, नवीन वर्ष आपणास सुख-समाधान, आनंद, ऐश्वर्य, आरोग्याचे जावो, जागतिक नववर्षाभिनंदन अशा शुभेच्छा संदेशांचा दिवसभर व्हॉट्स अॅप, फेसबुकवर वर्षाव सुरू होता. तसेच यावेळी अनेकांनी या वर्षातील संकल्पांची मित्र-मैत्रिणींसोबत देवघेव केली.
विधायक उपक्रमांनी नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2017 12:38 AM