कोल्हापूर : विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या जर्मनीतील म्युनिच शूटिंग रेंजवर झालेल्या विश्वचषक आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दुसऱ्यांदा आॅलिम्पिकमध्ये पदक पटकाविण्याची किल्ली मिळविली, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने केले.म्युनिच (जर्मनी) येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण व आॅलिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा कोटा मिळविल्यानंतर ती प्रथमच बुधवारी सायंकाळी कोल्हापुरातील राजारामपुरी येथील राहत्या घरी आली असता ती ‘लोकमत’शी बोलत होती. यावेळी तिच्या कुटुंबीयांनी तिचे जल्लोषी स्वागत केले.राही म्हणाली, म्युनिच येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनची शूटिंग रेंज ही कठीण समजली जाते; कारण या अगोदर विविध स्पर्धांच्या माध्यमातून १४ सामने या रेंजवर मी खेळले आहेत. त्यात मला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, सोमवारी (दि. २७) केलेल्या कामगिरीत मला ते सुवर्णपदकाच्या रूपाने मिळाले.
दुसऱ्यांदा आॅलिम्पिकचा कोटाही मिळाला आणि आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकाविण्याची किल्ली मिळाली. मी यापुढेही जाऊन २०२४ पर्यंतचे नियोजन केले आहे. त्यानुसार पुढच्या दोन आॅलिम्पिक स्पर्धा खेळायच्या आहेत. म्युनिच येथे झालेल्या स्पर्धेत ९६ देश सहभागी झाले होेते.
यापूर्वी चीन येथे झालेल्या आॅलिम्पिक स्पर्धेत १५ ते २० पॉइंटनी मी मागे होते. त्यात वारा, सूर्य आणि वातावरणाचा माझ्या कामगिरीवर परिणाम झाला. विशेषत: माझी प्रशिक्षक आॅलिम्पियन मुन्खबयार डोर्जेसुरेन हिच्यामुळे माझी चांगली कामगिरी झाली. तिनेही दोन पदके एकदा मंगोलियाकडून, तर दुसऱ्यांदा जर्मनीकडून पटकाविली आहेत.
मी अनेक अडचणींवर मात करीत देशासाठी आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणे या ध्येयाने खेळत आहे. सध्या माझे ध्येय आॅलिम्पिकचा कोटा मिळवणे होते. ते साध्य झाले. आता तयारी टोकियो आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पटकावण्याची तयारी सुरू आहे, असेही ती म्हणाली.तत्पूर्वी म्युनिच विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण व आॅलिम्पिक कोटा मिळाल्यानंतर ती प्रथमच बुधवारी सायंकाळी राजारामपुरी येथील राहत्या घरी आली असता तिचे आजी वसुंधरा यांनी औक्षण करून स्वागत केले. यावेळी राहीच्या वहिनी धनश्री, काकी कुंदा, आई प्रभा, वडील जीवन सरनोबत, काका राजेंद्र, भाऊ आदित्य, नामदेवराव शिंदे, भरत कदम, अर्चना सावंत, वनिता उत्तुरे, दत्तात्रय कदम, आदी नातेवाईक व हितचिंतक उपस्थित होते.‘वसुंधरा निवासा’त पुन्हा जल्लोषसोमवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास राहीची फिजिओ थेरपिस्ट श्लोका वरवटकर हिचा आदित्य सरनोबत यांना फोन आला की, राहीने म्युनिचमध्ये २५ मीटर, २२ स्पोर्टस पिस्तल प्रकारात सुवर्णपदकासह आॅलिम्पिकचा दुसऱ्यांदा कोटा मिळवला. त्यानंतर राहीच्या राजारामपुरीतील ‘वसुंधरा निवासा’मध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली.