कोल्हापूर : रुस्तम-ए-हिंद व महान भारत केसरी ज्येष्ठ कुस्तीगीर दादू चौगुले यांना मंगळवारी (दि. २५) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांचे करवीर नगरीत आगमन होताच मान्यवरांच्या हस्ते जल्लोषी स्वागत करण्यात आले.ढोल-ताशांच्या गजरात बिनखांबी गणेश मंदिर चौकातून कुस्तीगीर दादू चौगुले राहत असलेल्या प्रिन्सेस इंदुमती देवी गर्ल्स हायस्कूल समोरील राहत्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाहू छत्रपती, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, तालीम संघाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र हौसिंग फायनान्सचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, आदींच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.यावेळी दादू चौगुले यांचे चिरंजीव हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, कुस्ती संघटक पी. जी. पाटील, मधुकर भांडवले, कनिष्ठ सुपुत्र अमोल चौगुले, स्नुषा वैभवी चौगुले, अंजली चौगुले, सूर्यकांत चौगुले, बहीण निनाबाई तोंदकर यांच्यासह चौगुले यांचे नातेवाईक तसेच मोतीबाग तालीममधील कुस्तीगीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुस्तम-ए-हिंद दादू चौगुलेंचे जल्लोषी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:55 AM