सांगरूळ : पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे सांगरूळ परिसरात उत्साहात जल्लोषी स्वागत करण्यात आले.
यावेळी गावाच्या वेशीपासून पारंपरिक वाद्यांत मिरवणूक काढण्यात आली. आमदार जयंत आसगावकर शनिवारी सायंकाळी सांगरूळमध्ये आले. गावाच्या वेशीपासून लेझीम, धनगरी ढोलांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील आबालवृद्ध मिरवणुकीत सहभागी झाले होते. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केल्याने सारा गाव आनंदात न्हाऊन गेला हाेता. ठिकठिकाणी आमदार आसगावकर यांचे औक्षण करण्यात आले. बाजारपेठेत मिरवणूक आल्यानंतर आमदार आसगावकर यांनी सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, विलास नाळे, एस. एम. नाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, राजेंद्र सूर्यवंशी, यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, ‘कोजिमाशि’ पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास सुतार, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बालिंगे, कुडित्रे येथे जंगी स्वागत
आमदार आसगावकर शनिवारी सायंकाळी सांगरूळकडे जाताना वाटेत प्रत्येक गावात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. बालिंगे येथे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, कुडित्रे येथे यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत केले.
फोटो ओळी : आमदार जयंत आसगावकर यांचे सांगरूळमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. (फोटो-०६१२२०२०-कोल-सांगरूळ)
- राजाराम लोंढे