कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांचे बुधवारी पहिल्या दिवशी जल्लोषी स्वागत करण्यात आले. वाद्यांचा गजर, प्रभातफेरी काढून, तर पेढे-साखर वाटून स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेशाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जिल्ह्यातील सर्व शाळांत पहिला दिवस ‘प्रवेशोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. शाळेत दाखल करण्यासाठी आलेल्या पालकांनी परिसर फुलून गेला होता. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे स्वागत स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांनी करवीर तालुक्यातील बालिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी तारदाळ (ता. हातकणंगले), शिक्षणाधिकारी सुभाष चौगुुले यांनी दुंडवडे, आलूर (ता. गगनबावडा), माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी शहरातील मेन राजाराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) एम. एस. घुले यांनी मिणचे (ता. हातकणंगले), सभापती अभिजित तायशेटे यांनी राधानगरी या शाळांना भेट देऊन स्वागत केले. याशिवाय सर्वच सर्व खातेप्रमुखांनी विविध शाळांना भेटी देऊन स्वागत केले. मोफत पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहारासह गोड खाऊ वाटप केला. त्यामुळे शाळा परिसरात उत्साही, आनंदी वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंच्या १८ लाख ६७ हजार २०८ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील या खाटांगळे (ता. करवीर) येथील शाळेतील प्रवेशोत्सवासाठी उपस्थित होते. शहरातील महानगरपालिका शाळांतूनही जल्लोषी स्वागत करण्यात आले. महापालिका शाळेतील विद्यार्थी हरखलेकोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी आश्चर्याचा धक्का बसला. अगदी पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश आणि गुलाबपुष्प देऊन झालेल्या स्वागतामुळे तसेच गोडधोड पोषण आहारामुळे शाळेतील विद्यार्थी चांगलेच हरखून गेले. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व ५९ शाळांतील सुमारे १० हजार ५०० विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि ६६०० मागासवर्गीस विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी शिरा, गुलाबजाम असे दुपारचे भोजनही गोड मिळाले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येणार आहेत. प्रत्येक गणवेशाची किंमत चारशे रुपये आहे. खुल्या गटातील सुमारे साडेतीन ते चार हजार विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपूर्वी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून गणवेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. लक्षतीर्थ वसाहत येथील अण्णासाहेब शिंदे विद्यामंदिर येथे बुधवारी सकाळी महापालिका उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसेविका अनुराधा खेडेकर, माजी नगरसेवक सचिन खेडेकर, शिक्षण समितीचे प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, आदींच्या उपस्थितीत समारंभपूर्वक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षकवर्ग उपस्थित होता. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात विद्यार्थ्यांचे गोडधोड स्वागत
By admin | Published: June 16, 2016 12:27 AM